काही दिवसांपूर्वी बॉलीवुडचे निष्णात गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजे सर्वांचे लाडके केके यांचा दूर्दैवी मृत्यू झाला. अगदी कमी वयात म्हणजे वयाच्या ५३ व्या वर्षी एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान त्यांना हे जग सोडून जावं लागलं. ते कोलकोताच्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये लाईव्ह परफॉर्मेन्स करत होते. तिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं म्हणून त्यांना रुग्णालयात नेलं तर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे केके च्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.
केके यांचा जन्म आणि परिचय
कृष्णकुमार कुन्नथ यांचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्लीमध्ये झाला. त्यांची मातृभाषा मल्याळी होती. त्यांच्या वडिलांचं नाव सीएस नायर असून मातोश्रींचं नाव कुन्नाथ कनकवल्ली आहे. लहानपणी त्यांना डॉक्टर व्हावसं वाटत होतं. दिल्ली विश्वविद्यालयात कॉमर्स शाखेत डिग्री मिळवल्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये ८ वर्षे मार्केटिंग एक्झीक्यूटिव्हची नोकरी केली. नंतर ते १९९४ मध्ये मुंबईत आले.
लहानपणीच दुसरीत असताना त्यांनी आपल्या आवाजाची जादू दाखवली होती. त्यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून एक रॉक बॅंड सुद्धा तयार केला होता. किशोर कुमार आणि आरडी बर्मन हे त्यांचे आदर्श होते.
पत्नीने दिली साथ
१९९१ रोजी त्यांनी आपली प्रेयसी ज्योती हिच्यासोबत लग्न केलं. दोघेही बालपणीचे मित्र असल्याने संसार करण्यात त्यांना अडचण आली नाही. केके ने जेव्हा नोकरी सोडली तेव्हा त्यांच्यामागे त्यांची पत्नी ज्योती खंबीरपणे उभी होती. पत्नीला केके च्या दैवी आवाजावर विश्वास होता.
मुंबईतील स्ट्रगल
नोकरी सोडून मुंबईत आल्यावर त्यांनी लुइस बॅंक्स, रंजीत बरोट आणि लेस्ले लुइस यांना आपली डेमो टेप ऐकवली. त्यांना पहिला ब्रेक दिला तो यूटिव्ही ने. एका जाहिरातीत गाणं गाण्याची संधी त्यांना मिळाली. केके यांनी आपल्या करिअरमध्ये सुरुवातीस अनेक जिंगल्स लिहिले आणि आपला सुरेल आवाजही दिला. हिप हिप हुर्रे, शकालाका बुम बुम, जस्ट मोहब्बत अशा मालिकांसाठी त्यांनी गाणं गायलं आहे.
त्यांचा पहिला अल्बम ‘पल’ या नावाने १९९९ आला. यासाठी त्यांना स्टार स्क्रीन अवॉर्ड देखील मिळाला आहे. त्यांचा दुसरा अल्बम २००८ रोजी आला, ज्याचं नाव होतं ‘हमसफर’.
आयुष्याला मिळाली कलाटणी
१९९६ साली गुलजार यांनी त्यांना ‘माचिस’ या चित्रपटात गाण्याची संधी दिली. ‘छोड आए हम वो गलियां’ हे गाण्याने त्याकाळच्या तरुणांच्या मनावर राज्य केलं. हा त्यांचा चित्रपटसृष्टीतला पहिला ब्रेक होता. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. कमाल म्हणजे त्यांनी आपल्या आयुष्यात ३५००० पेक्षा अधिक जिंगल्स गायले आहेत.
तामीळ, तेलगू, मल्याळी, कन्नड, इंग्रजी अशा विविध भाषेतील शब्दांना त्यांनी आपला आवाज देऊन अमर केले आहे. १९९८ साली ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील गाणी त्यांनी गायली. ‘तड़प तड़प के इस दिल’ हे गाणं सुपरडुपर हिट झालं. केके हे नाव बॉलीवुडमध्ये सुवर्न अक्षरात कोरलं गेलं.
३ दशकांपेक्षा अधिक रसिकांच्या मनावर राज्य करुन केके आपल्याला सोडून गेले. आज केके जरी आपल्यात नसले तरी त्यांची गाणी मात्र आपल्यासोबत आहेत. केके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.