गणपतीनंतर आता दिवाळी सुट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात सहलींचे नियोजन करण्यात येत आहे. दिवाळीत शाळांना सुद्धा सुट्ट्या असतात त्यामुळे अनेकजण गावी किंवा फिरायला जातात. दिवाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते. अशावेळी तुम्ही तात्काळ कोट्याअंतर्गत कन्फर्म तिकीट मिळवू शकता. तात्काळ तिकीट काढताना तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.
( हेही वाचा : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार! १ ऑक्टोबरपासून एसी लोकलच्या ३१ फेऱ्या वाढणार)
तात्काळ तिकीट बुक करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा
आधीच लॉगिन करून ठेवा
रिझर्व्हेशन आधीच फुल्लं झाल्यामुळे नागरिकांना तात्काळ तिकिटे काढावी लागतात. तात्काळ कोटा हा एसीसाठी सकाळी १० वाजता सुरू होतो तर स्लिपर कोचसाठी बुकिंग ११ वाजेपासून सुरू होते. अशा वेळी तिकीट काढताना आधीच युजरआयडी, पासवर्ड टाकून अपडेट राहणे महत्त्वाचे असते.
मास्टर लिस्ट तयार करा
तुम्हाला जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुम्ही सर्वात आधी किती लोक रेल्वेने प्रवास करणार आहात याची लिस्ट बनवा, या सर्वांचे नाव, वय, लिंग यांची सविस्तर माहिती आधीच लिहून IRCTCवर मास्टर लिस्ट तयार करा. मास्टर लिस्ट बनवल्यामुळे तुम्हाला बुकिंग करताना वेगळी माहिती भरावी लागणार नाही.
बॅंकेचे डिटेल्स जवळ ठेवा
तात्काळ तिकीट फार कमी उपलब्ध असतात त्यामुळे वेळेआधी लॉगिन करणे महत्त्वाचे आहे. तसेच स्टेशन कोड, बर्थ सिलेक्शन आधीच करा, तात्काळ कोटा ओपन होताच आधीच सेव्ह करून ठेवलेली मास्टर लिस्ट अपडेट करून तिकीट बुक करा. ज्यावेळी पेमेंटची वेळ येते तेव्हा अनेकजण गोंधळतात अशा परिस्थितीत तुम्ही आधीच बॅंकेचे डिटेल्स काढून ठेवा.
इंटरनेट स्पीडची खात्री
तिकीट काढताना तुम्ही काळजीपूर्वक सर्व माहिती भरून इंटरनेट स्पीड बरोबर आहे का याची खात्री करा. अनेकवेळा इंटरनेट स्पीड चांगला नसेल तर बुकिंग करताना अडथळा येतो.
Join Our WhatsApp Community