कोरोना काळात फुफ्फुसाचे आरोग्य तपासण्यासाठी अशी करा चाचणी…

कोणी, कशी आणि कधी करावी चाचणी? याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या...

150

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी(सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.

ऑक्सिजनची कमतरता लक्षात येईल

राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटे चालण्याच्या चाचणीबाबत अधिक जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल, जेणेकरुन गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

चाचणी कोणी करावी

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती. तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.

(हेही वाचाः ही आहे मुंबई पोलिसांची स्टिकर स्ट्रॅटेजी…)

अशी करावी चाचणी

ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अती वेगात किंवा हळूहळू चालू नये, तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तब्येत उत्तम आहे असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी, जेणेकरुन काही बदल होतो का ते लक्षात येईल.

चाचणीचा निष्कर्ष

जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे. ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करू नये, ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.