तुम्हीच तुमच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करा! कशी ते वाचा…

तुमच्या बाप्पाची प्रतिष्ठाना तुम्हीच केली तर! आनंद द्विगुणित होईल. चला तर मग, यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा घरी आल्यावर त्याची प्राणप्रतिष्ठापना कशी करायची त्याची पूजा पद्धती सविस्तर जाणून घेऊया!

245

बाप्पा तुमच्या घरी येतोय, तयारी सुरु झाली असेलच! बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. घरामध्ये जिथे त्यांची प्रतिष्ठापना करायची आहे त्या जागेची आरास पूर्ण झाली असेलच, जेवढे दिवस बाप्पा घरी आहे तेवढे दीड, पाच, सात किंवा ११ दिवस बाप्पाला कोणता नैवद्य करायचा त्याचा मेनूही ठरला असेल. बरोबरच आहे! श्री गणेशाच्या आगमनाने घराघरात प्रफुल्लित वातावरण निर्माण होते, घरातील वातावरणाबरोबर मनामनात सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे श्रीगणेशाचे आगमन सर्वांना हवेहवेसे वाटत असते. अशा वेळी तुमच्या बाप्पाची प्रतिष्ठाना तुम्हीच केली तर! आनंद द्विगुणित होईल. चला तर मग, यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा घरी आल्यावर त्याची प्राणप्रतिष्ठापना कशी करायची त्याची पूजा पद्धती सविस्तर जाणून घेऊया!

प्रतिष्ठापना आधीची तयारी! 

आधी घरातील केर काढावा. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. खोलीत धूप दाखवावा. देवपूजेची उपकरणे घासूनपुसून स्वच्छ करून घ्यावीत. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण (पाणी शिंपडणे) करावे. पूजेच्या प्रारंभी सोवळे किंवा पितांबर अथवा धूतवस्त्र (धोतर) आणि उपरणे परिधान करावे. पूजा आरंभ करण्यापूर्वी घरातील वडीलधारी मंडळी यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

आचमन करणे

उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि श्रीविष्णूच्या प्रत्येक नावाच्या शेवटी ‘नमः’ हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे –

श्री केशवाय नमः।,  श्री नारायणाय नमः ।, श्री माधवाय नमः । चौथे नाव उच्चारतांना ‘नमः’ या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.

श्री गोविन्दाय नमः ।

पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावेत अन् शरणागत भावासह पुढील नावे उच्चारावीत.

श्री विष्णवे नमः।, श्री मधुसूदनाय नमः।, श्री त्रिविक्रमाय नमः।, श्री वामनाय नमः।, श्री श्रीधराय नमः।, श्री हृषीकेशाय नमः।, श्री पद्मनाभाय नमः।, श्री दामोदराय नमः।, श्री सङ्कर्षणाय नमः।, श्री वासुदेवाय नमः।, श्री प्रद्मुम्नाय नमः।, श्री अनिरुद्धाय नमः।, श्री पुरुषोत्तमाय नमः।, श्री अधोक्षजाय नमः।, श्री नारसिंहाय नमः।, श्री अच्युताय नमः।, श्री जनार्दनाय नमः।, श्री उपेन्द्राय नमः।, श्री हरये नमः।, श्री श्रीकृष्णाय नमः।।

पुन्हा आचमनाची कृती करून २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत.

देवतास्मरण

श्रीमन्महागणाधिपतये नमः।, इष्टदेवताभ्यो नमः।, कुलदेवताभ्यो नमः।, ग्रामदेवताभ्यो नमः।, स्थानदेवताभ्यो नमः।, वास्तुदेवताभ्यो नमः।, आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः।, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः।, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः।, अविघ्नमस्तु।
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके।

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।

‘देशकाल’ आणि ‘संकल्प’श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणपथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरेे शालिवाहन शके अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके प्लव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थ्यां तिथौ शुक्र वासरे चित्रा दिवस नक्षत्रे ब्रह्मा योगे वणिज करणे तुला स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे सिंह स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये कुंभ स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ मकर स्थिते वर्तमाने श्रीशनैश्‍चरौ शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु एवङ् ग्रह-गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ…

ज्यांना वरील ‘देशकाल’ म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर ‘संकल्प’ उच्चारावा.

तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च ।
योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ।।

अर्थ : तिथी, वार, नक्षत्र, योग, करण इत्यादींच्या उच्चारणाचे सर्व फल श्रीविष्णूच्या स्मरणाने प्राप्त होते; कारण सर्व जगच विष्णुमय आहे.

श्री महागणपतिपूजन

प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार ताम्हण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर तांदळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ ठेवतांना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.
नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावेत आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे अन् पुढील श्लोक म्हणावा.

वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

आवाहन

उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन ‘आवाहयामि’ म्हणतांना त्या श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी वहाव्यात.

श्रीमहागणपतये नमः । महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ।।

आसन

उजव्या हातात अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना त्या श्री महागणपतीच्या चरणी वहाव्यात.

श्री महागणपतये नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

चंदनादी उपचार

उजव्या हाताच्या अनामिकेने गंध (चंदन) देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना ‘समर्पयामि’ हा शब्द उच्चारत कंसात दिल्याप्रमाणे उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत.

उजव्या हातात २ दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडून) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळ्यांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावेत.
प्राणाय नमः ।, अपानाय नमः ।, व्यानाय नमः ।, उदानाय नमः ।, समानाय नमः ।, ब्रह्मणे नमः ।।

पूजेशी संबंधित उपकरणांचे पूजन

कलशपूजन,  शंखपूजा, घंटापूजा, दीपपूजा, मंडपपूजन

(हेही वाचा : घरगुती गणेशमूर्तींच्या आगमन, विसर्जनासाठी महापालिकेची नियमावली जाहीर)

श्री गणेशमूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा

श्री गणेशमूर्तीची स्थापना पूर्व दिशेला करावी. तसे करणे शक्य नसल्यास पूजकाचे मुख दक्षिण दिशेकडे होणार नाही, अशा रीतीने श्री गणेशमूर्तीची स्थापना करावी. ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची आहे, त्या पाटाच्या मध्यभागी १ मूठ अक्षता (धुतलेले अखंड तांदूळ) ठेवाव्यात. त्यावर पिंजरीने स्वस्तिक काढावे. नंतर त्या तांदळावर पुढीलप्रमाणे मूर्तीची ‘प्राणप्रतिष्ठा’ करावी. ‘प्राणप्रतिष्ठा’ म्हणजे मूर्तीमध्ये देवत्व आणणे. यासाठी पूजकाने स्वतःचा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून ‘या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहे’, असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत.

अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च ।
अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।।
नंतर ‘ॐ’ किंवा ‘परमात्मने नमः ।’ असे १५ वेळा म्हणावे.

पहिला उपचार – आवाहन

उजव्या हातात अक्षता घेऊन ‘आवाहयामि’ म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी वहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.)श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । आवाहयामि ।।

दुसरा उपचार – आसन

उजव्या हातात अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना देवांच्या चरणी वहा.आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

तिसरा उपचार – पाद्य

उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । पाद्यं समर्पयामि ।।

चौथा उपचार – अर्घ्य

डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी नि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर शिंपडा.श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । अर्घ्यं समर्पयामि ।।

पाचवा उपचार – आचमन

डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा घ्या. नंतर ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि श्री गणपति यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । आचमनीयं समर्पयामि ।।

सहावा उपचार – स्नान

पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी नि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर शिंपडा.

 श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । स्नानं समर्पयामि ।।

सातवा उपचार – वस्त्र

कापसाची दोन तांबडी वस्त्रे घ्या अन् ‘समर्पयामि’ म्हणतांना त्यांतील एक वस्त्र मूर्तीच्या गळ्यात अलंकारासारखे घाला, तर दुसरे मूर्तीच्या चरणांवर ठेवा.
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः ।

कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ।।

आठवा उपचार – यज्ञोपवीत

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । यज्ञोपवीतं समर्पयामि ।।

श्री उमायै नमः । उपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

नववा उपचार – चंदन

श्री उमायै नमः । श्रीसिद्धिविनायकाय नमः । सिन्दूरं समर्पयामि ।। (गौरी अन् सिद्धिविनायक यांना शेंदूर वहावा.)

दहावा उपचार – फुले-पत्री

श्री उमामहेश्वराभ्यां नमः । तुलसीपत्रं बिल्वपत्रं च समर्पयामि ।।

अकरावा उपचार – धूप

उदबत्ती ओवाळावी किंवा धूप दाखवावा.
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ।।

बारावा उपचार – दीप

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)

तेरावा उपचार – नैवेद्य

नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि ।

हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।।

आरती

नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करावी. तत्पूर्वी तीन वेळा शंखनाद करावा. आरती करतांना ‘श्री गणेश प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती करावी. आरतीचे तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञाचक्रापर्यंत (छातीपासून कपाळापर्यंत) ओवाळावी. आरतीला उपस्थित असलेल्यांनी आरतीचा अर्थ लक्षात घेऊन ती म्हणावी. आरती म्हणतांना ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात. टाळ्यांच्या जोडीला वाद्ये हळुवार वाजवावीत. घंटा मंजुळ नादात वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.

(हेही वाचा : कोकणात जाताना टोल भरू नका, कारण…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.