गर्भावस्थेदरम्यान जास्त जोखीम वाटतेय? मग तज्ज्ञांच्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा आणि सुदृढ बाळाला जन्म द्या!

81

सध्याची जीवनशैली आणि कामाचे स्वरुप पाहता अनेक महिला जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेतून जात असतात. तुम्ही देखील जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेतून(High Risk Pregnancy) जात असाल, तर भावनिक उतार-चढाव होणे साहजिक आहे. चिंतातुरता आणि तणाव हे अपरिहार्य असले, तरी या जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेचा जास्त त्रास करुन घेण्याची आवश्यकता नाही. अप्रतिम वैद्यकीय सुविधा आणि नियमित जन्मपूर्व आरोग्यसेवांचा विकास झाल्यामुळे, जास्त जोखीम असूनही, तुमचे बाळ सुदृढ होऊ शकते आणि प्रसूती देखील सुरक्षित होऊ शकते.

सुदृढ बाळासाठी ‘या’ प्रकारे घ्या स्वतःची काळजी

परिस्थितीचा स्वीकार करा

जास्त जोखीम असलेली गर्भावस्था हाताळण्याची पहिली पायरी म्हणजे या परिस्थितीचा स्वीकार करणे. आपल्याला जास्त जोखीम असलेली गर्भावस्था आहे, हे माहीत असेल तर तुम्ही अधिक जागरुक असता आणि ही परिस्थिती हाताळण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होता. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जाणार आहात, हे तुम्हाला माहीत असते. यात होणाऱ्या गुंतागुंतीचीही तुम्हाला जाणीव असते. तुम्ही ही परिस्थिती आहे, हे मान्यच केले नाही तर तुम्ही यातील धोके समजू शकणार नाही आणि आवश्यक असलेले उपचार तुमच्यावर होणार नाहीत.

डॉक्टरांवर विश्वास ठेवा

जास्त जोखीम असलेली गर्भधारणा हाताळण्याची गुरुकिल्ली म्हणजे तुमच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवणे. तुमचे डॉक्टर तुमचे हित चिंततात आणि त्यानुसारच सल्ला देतात यावर विश्वास ठेवा. इंटरनेटवरील लेख वाचणे किंवा नातेवाईक किंवा मित्रमंडळींचा अनाहूत सल्ला ऐकल्याने विनाकारण गुंतागुंत वाढू शकते. अशावेळी केवळ तज्ज्ञांचाच सल्ला घ्यावा. तसेच, या दिवसांत ऑनलाईन अनावश्यक माहिती वाचणे आणि मनाचा गोंधळ वाढवणे टाळा.

(हेही वाचाः कोरोना काळात फुफ्फुसाचे आरोग्य तपासण्यासाठी अशी करा चाचणी…)

व्यवस्थापनात सातत्य ठेवा

तुमच्या व्यवस्थापन नियोजनात सातत्य ठेवा. याशिवाय औषधे वेळेवर घ्या, कोणतीही सप्लिमेंट्स चुकवू नका. हे सर्व घटक तुमच्या बाळाच्या सुदृढ वाढीसाठी गरजेचे आणि महत्त्वाचे असतात. काही साईड इफेक्ट्स उद्भवले तर, लगेचच तुमच्या डॉक्टरांना कळवा. कोणताही त्रास होत असेल, तर डॉक्टरांना कळवण्यास कचरू नका. तुमच्या जास्त जोखीम असलेल्या गर्भावस्थेत तुम्हाला कोणत्या समस्या जाणवत आहेत, ते डॉक्टरांना विस्तृतपणे सांगा.

आहारावर काटेकोर नियंत्रण ठेवा

आहार हा निरोगी जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असतो. तुमची जास्त जोखीम असलेली गर्भधारणा पाहता, सकस आहार अधिकच गरजेचा ठरतो. जिभेचे प्रत्येक चोचले भागवण्याच्या मोहात पडू नका. योग्य प्रमाणात आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी आहारावर नियंत्रण ठेवा आणि स्निग्ध व साखरयुक्त पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवा. जंक फूड पूर्णपणे वर्ज्य करा. गर्भलिंग मधुमेह अर्थात ‘जेस्टेशनल डायबिटीस’ असेल, तर तुम्हाला साखर पूर्ण वर्ज्य करावी लागेल. गरोदरपणात उच्च रक्तदाब म्हणजेच एक्लेम्प्सिया आणि प्रि-एक्लेम्प्सिया असेल, तर मीठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रकृतीनुसार तुम्हाला पूर्ण विश्रांती घेण्यासही सांगितले जाऊ शकते. अतिरिक्त मीठ व साखर शरीरात जाऊ नये यासाठी आहाराचे पथ्य पाळणे हितकारक ठरते.

नियमित व्यायाम करा

व्यायामामुळे शरीर मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहते. पण तुम्हाला जास्त जोखीम असलेली गर्भधारणा असेल आणि प्लॅसेंटाने गर्भाशयाचा अंशतः किंवा पूर्ण भाग आच्छादला असेल, तर योगासने व प्रसवपूर्व व्यायाम करू नये. याआधी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार तुमच्यासाठी योग्य असलेले व्यायाम निवडा आणि केवळ तेच व्यायाम नियमितपणे करा.

( हा लेख डॉ. गंधाली देवरुखकर, स्त्रीरोगतज्ज्ञ, वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल यांच्या माहितीवर आधारित असून, कोणत्याही उपचारांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.