डोळ्यांच्या विविध समस्या आहेत? तर मग वाचा तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स

मुंबईतील डॉ.अग्रवाल आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सेवा विभागाच्या प्रमुख डॉ. निता शाह यांनी याबाबत काही टिप्स दिल्या आहेत.

197

डोळा शरीरातील सर्वात नाजूक अवयव. पण या नाजूक इंद्रियाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपण दररोज डोळ्यांची काळजी घेण्याच्या सवयींचा सराव केल्यास डोळ्याच्या अडचणी सहज टाळता येतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच अत्यंत महत्वाच्या सवयींकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केले जाते. आपले डोळे आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टी दृढ ठेवण्यासाठी डोळ्यांची निगा व काळजी घेतली पाहिजे. मुंबईतील डॉ.अग्रवाल आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सेवा विभागाच्या प्रमुख डॉ. निता शाह यांनी याबाबत काही टिप्स दिल्या आहेत.

का येते डोळ्यात पाणी ???

डोळ्यात पाणी येणे वा अश्रू येणे हे डोळ्यांसाठी काही प्रमाणात लाभदायी ठरते. कारण डोळे ल्युब्रिकेटेड ठेवण्यासाठी आणि डोळ्यात गेलेले बाहेरील कण काढून टाकण्यासाठी ते उपयुक्त असतात. मुंबईतील डॉ.अग्रवाल आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सेवा विभागाच्या प्रमुख डॉ. निता शाह यांनी डोळ्यातून पाणी येण्यामागचे विज्ञान विस्तृतपणे सांगितले. वैद्यकीय शास्त्रात रडण्याव्यतिरिक्त चेहऱ्यावर अश्रू येण्याला एपिफोरा असे म्हणतात. हे एका आजाराचे लक्षण आहे, ज्यात डोळ्यांत अपुऱ्या टिअर फिल्म ड्रेनेज तयार होतात. या परिस्थितीत अश्रू नॅसोलाक्रिमल सिस्टिमच्या माध्यमातून जाण्याऐवजी चेहऱ्यावर ओघळतात.

(हेही वाचाः ‘केस’ कापायला गेली आणि 2 ‘कोटी’ घेऊन आली)

संसर्ग होण्याचा धोका

अश्रूंची प्रमाणापेक्षा अधिक निर्मिती आणि कोंडलेल्या वाहिन्या यामुळे डोळ्यातून पाणी येते. बाळांमध्ये कोंडलेल्या वाहिन्या हे सर्वसाधारण आढळणारे कारण आहे. काही बालकांमध्ये जन्मजात अविकसित वाहिन्या असतात, काही आठवड्यांनी या पूर्ण विकसित झाल्यावर त्या रिकाम्या होतात. अश्रूवाहिनी निमुळती झाली असेल किंवा कोंडली असेल तर संसर्ग होण्याचा धोका असतो. परिणामी, अश्रूंच्या पिशवीत अश्रू साचून राहू शकतात. प्रौढांमध्ये आणि मोठ्या मुलांमध्ये अश्रूंची अतिनिर्मिती हे सामान्यपणे आढळणारे कारण असते, असे डॉ. शाह यांनी सांगितले आहे.

डोळ्यात धुळीचे कण गेल्यास काय करावे?

धुळीचे कण वा काही पदार्थ डोळ्यात गेले तर सामान्य तापमान असलेल्या स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे आणि संबंधित व्यक्तीने डोळे चोळू नयेत. हे केल्यानंतरही डोळ्यात गेलेले बाहेरचे पदार्थ डोळ्यातच असल्याची जाणीव कायम असेल तर रुग्णाने नेत्रविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ल्युब्रिकेशनसाठी कृत्रिम अश्रू, अँटिबायोटिक ड्रॉप्स वापरुन ते कण बाहेर काढावेत. रासायनिक घटकांमुळे इजा झाली असेल तर भरपूर स्वच्छ पाणी घेऊन डोळा धुवावा आणि रुग्णाने नेत्रविकार तज्ज्ञांची भेट ताबडतोब घ्यावी.

(हेही वाचाः बिबट्याचे संवर्धन ही काळाची गरज!)

डोळ्यातून पाणी येण्याच्या संबंधित काही समस्या

अॅलर्जिक कंजंक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येणे ही स्थिती एका अॅलर्जनमुळे उद्भवते, जी शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या प्रमाणापेक्षा अधिक दिल्या गेलेल्या प्रतिसादामुळे निर्माण होते. त्यामुळे डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांत खाज येणे, डोळे लाल होणे आणि पाहताना त्रास होणे हे परिणाम होतात. रुग्णांनी ॲलर्जेन टाळावेत, डोळे चोळू नयेत आणि कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नयेत. संसर्गजन्य कंजन्क्टिव्हायटिसमध्ये डोळे लाल होणे, वेदना होणे, प्रकाशाकडे बघण्यास त्रास होणे, चिकटपणा जाणवणे, चिकट द्रव बाहेर येणे ही लक्षणे दिसू शकतात. हा संसर्ग कोणत्याही उपचाराविना एका आठवड्यात बरा होऊ शकतो.

डोळ्यात शुष्कपणा येणे

डोळ्यात शुष्कपणा येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. यात शरीराकडून अश्रूंची पुरेशी निर्मिती न होणे, अश्रू पटकन सुकणे, पाणी आणि म्युकस यांचे योग्य संतुलन नसणे, वाहता वारा थेट डोळ्यात जाणे, वाढलेले वय आणि काही आजार(थायरॉईड आय आजार, गंभीर स्वरुपाचा सायनस, ऱ्ह्युमेटॉइड आर्थरायटिस, जॉग्रेन्स सिण्ड्रोम, एसएलई इत्यादी) यांचा समावेश आहे.

(हेही वाचाः मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा… ‘या’ दिवशी पाणी येणार नाही)

पापण्यांच्या समस्याही कारणीभूत

डोळ्यात पाणी येण्यासाठी पापण्यांच्या समस्याही कारणीभूत असू शकतात. यात पापण्यांच्या कडेचा भाग वळणे किंवा पापण्यांच्या कडा बाहेरच्या बाजूस वळणे किंवा पापण्या अपुऱ्या बंद होणे इत्यादींचा समावेश आहे. धूळ, रेती, कीटक, कॉन्टॅक्ट लेन्स यामुळे कॉर्नियाला(नेत्रपटल) चरा पडू शकतो. अशा परिस्थितीत संसर्ग वाढू नये यासाठी रुग्णाने नेत्रविकार तज्ज्ञांची ताबडतोब भेट घ्यावी.

रांजणवाडी कशी येते?

पापण्यांच्या कडांजवळ असलेल्या ग्रंथी कोंडल्यास किंवा त्यांना संसर्ग झाल्यास ब्लेफरायटिस होऊ शकतो. अशा परिस्थितीत रुग्णांच्या डोळ्यातून पाणी येऊ शकते, डोळे लाल होऊ शकतात, डोळ्यांमध्ये कंड येऊ शकते आणि पापण्यांच्या वर कोंडा जमा होऊ शकतो. ब्लेफरायटिसशी संबंधित रांजणवाडी ही लाल रंगाची सुजलेली पुळी असते जी पापण्यांच्या कडेला तयार होते आणि बाहेरील पापण्यांच्या जवळ असते किंवा आत असते किंवा पापण्यांच्या खाली असते(अंतर्गत) आणि तैल ग्रंथींना सूज येते.

(हेही वाचाः यंदा मुंबईकरांची 100 टक्के तहान भागणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.