घरविक्रीत मुंबई ‘देशात भारी’, तीन महिन्यांत झाली इतक्या घरांची खरेदी

115

इमारतींच्या उंचीप्रमाणेच मुंबईतील घरांच्या किंमती देखील गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेण्याची इच्छा असणा-यांना घरघर लागली आहे. पण तरीही घरविक्रीत मुंबई देशात नंबर वन असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या तीन महिन्यांत देशातील प्रमुख 8 शहरांपैकी मुंबईत सर्वाधिक घरांची खरेदी झाल्याचे नाईट फ्रँक या रिअल इस्टेट सल्लागार कंपनीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

(हेही वाचाः लोडशेडिंगला सुरूवात, तुमच्या शहरातही होणार बत्ती गुल?)

इतक्या घरांची खरेदी

जानेवारी ते मार्च 2022 या तीन महिन्यांच्या कालावधीत देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये एकूण 78 हजार 627 घरांची विक्री झाली आहे. त्यापैकी सर्वात जास्त 21 हजार 548 घरांची खरेदी ही मुंबईत नोंदवली गेल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तर पुण्यात याच कालावधीत एकूण 10 हजार 305 घरांची विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आगामी काळात घरे महागणार

देशात आगामी काळात नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून एकूण 78 हजार 171 घरे उपलब्ध होणार आहेत. यामध्ये मुंबईत 23 हजार 558, तर पुण्यात 9 हजार 220 घरे उपलब्ध होणार आहेत. कोविड काळात देशातील घरविक्रीच्या संख्येत मोठी घट झाली होती. पण आता पुन्हा एकदा घरविक्रीला गती मिळाली आहे. घरांच्या उभारणीसाठी लागणारा सिमेंट, लोखंड यांसारखा कच्चा माल महागल्यामुळे येत्या काळात घरांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण तरीही घर खरेदीला मिळणारा हा प्रतिसाद आशादायी असल्याचे विकासकांचे म्हणणे आहे.

(हेही वाचाः राज्यात उष्माघाताचा कहर! ८ बळी, ९२ जणांवर उपचार सुरू)

2021च्या तुलनेत झाली घट

2021 च्या तुलनेत 2022 च्या पहिल्या तिमाहीत मुंबईतील घर विक्री आणि नव्या घरांच्या निर्मितीत घट झाल्याचे पहायला मिळत आहे. जानेवारी ते मार्च 2021 या काळात मुंबईत एकूण 23 हजार 558 घरांची विक्री झाली होती, तर 31 हजार 125 नवीन घरांची निर्मिती झाली होती. मुद्रांक शुल्कात सरकारने दिलेल्या सवलतीमुळे 2021 मध्ये मुंबईतील घर विक्रीत विक्रमी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण 2022 मध्ये अशी कोणतीही सवलत नसतानाही पहिल्या तिमाहीतील घरविक्रीचं चित्र समाधानकारक आहे, अशी माहिती नाईट फ्रँकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी माध्यमांना दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.