आठ महिन्यांमध्ये सुमारे ५० हजार प्रवाशांचा व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास

90

मध्य रेल्वेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस, पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीनला जोडलेल्या या डब्यांमधून ऑक्‍टोबर- २०२१ ते २३ मे २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने ४९ हजार ८९६ प्रवाशांची नोंदणी करून ६.४४ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.

व्हिस्टाडोमची लोकप्रियता

मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये २०१८ मध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा जोडण्यात आला होता. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे २६ जून २०२१ पासून मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे मुंबई-पुणे मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला. मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची विलोभनीय दृश्ये असोत, वरून काचेचे छप्पर आणि रुंद खिडक्यांसह हे डबे लोकप्रिय सिद्ध झाले आहेत.

(हेही वाचाः भांडुप, पवई आणि विक्रोळीच्या डोंगराळ भागातील जनतेला धोक्याचा इशारा)

ही आहेत वैशिष्ट्ये

व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स यांसारखी अनेक असामान्य वैशिष्ट्ये आहेत. दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरॅमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट याशिवाय व्ह्यूइंग गॅलरी सुद्धा यात आहे.

(हेही वाचाः शिवाजीपार्कची हिरवळ राखण्यासाठी झटणार २४ हात)

इतक्या महसूलाची कमाई

ऑक्‍टोबर-२०२१ ते २३ मे २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने ४९ हजार ८९६ प्रवाशांची नोंदणी करून, ६.४४ कोटी रुपये महसूल मिळवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस १००% पेक्षा जास्त म्हणजेच १८ हजार ६९३ प्रवासी वाहतुकीतून ३.७० कोटी रुपये उत्पन्नाची नोंद करून आघाडीवर आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीनने अप दिशेने म्हणजे (पुणे ते मुंबई) प्रवासात १.६३ कोटी रुपयांच्या उत्पन्नासह ९९% वहिवाट (ऑक्युपंसी) नोंदवली आहे आणि १००% वहिवाट (ऑक्युपंसी) असलेल्या डेक्कन एक्सप्रेसमधून १६ हजार ४५३ प्रवासी वाहतुकीतून १.११ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.