आता एटीएममध्ये कॅश नसेल, तर बँकांना भरावा लागणारा दंड

165

जेव्हा आपल्याला पैशांची तातडीने गरज असते, तेव्हा आपण बँकेच्या एटीएममध्ये जातो आणि त्याचवेळी नेमकी आपल्याला कॅश मिळत नाही. हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी आलाच असेल.पण आता ग्राहकांना सहन करावा लागणारा हा त्रास आणि ऐनवेळी त्यांची होणारी गैरसोय ट्ळण्यासाठी आता आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

बँकांवर आकारणार दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममध्ये रोकड संपल्याबद्दल बँकांना दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल. एटीएममध्ये वेळेवर पैसे जमा न करणाऱ्या संबंधित बँकेवर 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. एटीएममध्ये कॅश नसल्यास संबंधित बँकांना आरबीआयकडून हा दंड आकारण्यात येणार आहे.

(हेही वाचाः १७ ऑगस्टपासून शाळा सुरू, असे आहेत नियम)

बँकांनी जबाबदारी उचलावी

लोकांच्या सोयीसाठी एटीएम मशीनमध्ये पुरेसा निधी वेळच्या वेळी उपलब्ध केला जावा, हा दंड आकारण्यामागचा मुख्य हेतू असल्याचे आरबीआयने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आपल्या विस्तृत नेटवर्कद्वारे जनतेला पैसे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी बँक व्यवस्थापनाने उचलणे आता गरजेचे आहे. त्यासाठी एटीएममध्ये पैसे उपलब्ध करुन देणारी यंत्रणा बँकांनी सक्षम करणे गरजेचे आहे.

असा आकारला जाणार दंड

जर एका महिन्यात 10 तासांपेक्षा जास्त काळ कोणत्याही एटीएममध्ये रोख रक्कम ठेवली नाही, तर प्रत्येक एटीएमसाठी बँकेला दहा हजार रुपये दंड आकारला जाईल. व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरकडून बँक दंडाची रक्कम वसूल करू शकते. जून 2021 अखेर देशभरातील विविध बँकांमध्ये 2,13,766 एटीएम आहेत.

(हेही वाचाः 15 ऑगस्टपासून कसा मिळणार लोकल ट्रेनचा पास? जाणून घ्या संपूर्ण माहिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.