पाटण तालुक्यातील गावक-यांकडून सांबाराची शिकार

130

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणा-या साता-यातील पाटण तालुक्यातील मौजे गावातील गावक-यांनी चक्क सांबाराची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतीत माहिती मिळताच गावक-यांना सांबाराचे मांस शिजवताना रंगेहाथ पकडून वनविभागाने ताब्यात घेतले. सहा आरोपींचा ताबा घेताना संपूर्ण गावाने या प्रकरणी वनविभागाला कडाडून विरोध केल्याचे समजते. शिवाय सहा आरोपीही चौकशी प्रकरणात कोणतेही सहकार्य करत नसल्याचीही माहिती सूत्रांकडून समजली आहे.

१३ डिसेंबर रोजी वनविभागाने मौजे गावातील तीन घरांवर धाडी टाकल्या. या धाडीत सिताराम शेंडे, विशाल पवार, अशोक विचारे या तीन आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले. यासह संजू विचारे, आनंदा विचारे, महेंद्र जगताप यांना संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आले आहे. संजू विचारे यांच्या घरी वनविभागाला दोन शिंगेही सापडली आहेत.

गुन्ह्याचे स्वरुप 

वन्य प्राण्याची शिकार करणे, मांस बाळगणे, शिजवणे व त्याचा वापर करणे हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार, गंभीर गुन्हा ठरतो. आरोपींना सात वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे.

कारवाई करणारे वनविभागाचे पथक 

सह्याद्री व्याघ्र संरक्षणाचे उपसंचालक उत्तम सावंत, साहाय्यक वनसंरक्षक तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेळवाकचे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे, वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर राक्षे तसेच वनरक्षकांच्या टीमने मौजे गावात कारवाई केली.

बंदूक घेऊन होत आहेत शिकारी

याआधीही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गातील भागांतील बफर विभागात लावलेल्या कॅमेरा ट्रेपमध्ये शिकारींच्या हालचाली टिपल्या गेल्या आहेत. बंदूक आणि लाईट घेऊन जाणा-या शिकारा-यांची नावेही स्थानिक गावक-यांना माहित आहेत. हेळवाक आणि नेचल भागात राहणारे गावकरीच शिकार करत असल्याची माहिती वनविभागाला आहे. परंतु याप्रकरणी चौकशी झालेली नाही, असे सातारा वनविभाग, मानद वन्यजीव रक्षक तसेच वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष रोहन भाटे म्हणाले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलाची मागणी

पाच जिल्ह्यांत मोडणा-या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची विस्तीर्ण जागा लक्षात घेता, वन्यजीवांच्या संरक्षणाची विशेष व्याघ्र संरक्षण दलाची नियुक्ती होणेही आवश्यक आहे. या दलाची मंजुरी केंद्रीय स्तरावरुन अद्यापही प्रलंबित आहे. या दलाची तातडीने नियुक्ती होण्याची आवश्यकता आहे. किमान १२० जणांच्या तुकडीमुळे जंगलात सतत गस्त राहील. शिकारीच्या घटनाही आटोक्यात येतील. बेकायदेशीर बॉक्साईट खाणकाम नियंत्रित होण्यासही मदत होईल, असे रोहन भाटे म्हणाले.

का आहे दक्षिण महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला संरक्षणाची गरज?

  •  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोडणा-या कोल्हापूर जिल्ह्यातील चंडगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघाचा अधिवास आढळून आला आहे. वाघाने शिकार केल्याची नोंदही गेल्या महिन्यात झाली होती.
  • आजरा बुदारगड चंदगड, तिल्लारी, विशालगड, पन्हाळगड, राधानगरी आदी प्रमुख संरक्षित वनक्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोडतात. आंबोली-दोडामार्ग, चंदगड आणि तिलारी या तिन्ही राखीव वनक्षेत्रांमध्ये वाघाचा अधिवास आहे. लॉकडाऊनच्या काळात नर वाघाचे छायाचित्र वनविभागाच्या कॅमेरा ट्रेपमध्ये कैद झाले आहे. याभागात अन्य वन्यजीवांचाही वावरही चांगला आहे.

 ( हेही वाचा: गुलाबराव पाटलांची घसरली जीभ, म्हणाले, ‘रस्ते हेमा मालिनीच्या गालाप्रमाणे…’ )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.