‘जंक फूड’ने लहान मुलांच्या दातांचे आरोग्य धोक्यात

136

लहान मुलांना चॅाकलेट, बिस्कीट, लॅालीपॅाप, केक या गोष्टी जास्त आवडतात. जेवण माहितीच नाही, जास्त प्रमाणात जंक फूडचं सेवन केलं जातं.  या जंक फूडने लहान मुलांच्या दातांची वाट लागली आहे. बदलापूर येथे झालेल्या एका शिबिरात तपासण्यात आलेल्या 92 टक्के लहान मुलांमध्ये दात किडणे, हिरड्या सुजणे यासोबतच इतर दातांच्या निगडित तक्रारी आढळल्या आहेत. त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षी पडणारे दुधाचे दात आता अवघ्या चार ते पाच वर्षांत पडत आहेत आणि नविन येणा-या दातांचे स्वास्थही बिघडत असल्याचे समोर आले आहे. बालदिनानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

90 टक्के मुलांना दातांच्या तक्रारी 

बदलापूर येथील शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक 7 च्या वतीने अॅड. तुषार साटपे आणि महिला आघाडीच्या उपविभाग प्रमुख सुवर्णा साटपे यांच्या वतीने लहान मुलांसाठी दंत शिबिराचे आयोजन केले होते. बदलापुरातील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॅाक्टर सुतेजा स्वामी यांनी मुलांची तपासणी केली. हा जरी छोटेखानी कार्यक्रम असला तरी, यावेळी तपासणी करण्यात आलेल्या सर्वच बालकांना दातांच्या समस्या होत्या. या सर्व बालकांना या तपासणीदरम्यान धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. या तपासणीदरम्यान साधारण 90 ते 92 टक्के मुलांचे दात किडलेले आढळले. केक, चॅाकलेट, जंकफूड यासोबतच रोज दातांची काळजी न घेणे किंवा अनुवांशिक दातांच्या तक्रारी यासुद्धा ब-याच मुलांमध्ये आढळून आल्या. आनुवांशिकतेने दातांच्या तक्रारी उद्भवू शकतात, हे पालकांना यावेळी नव्यानेच समजले. यावेळी बहुतांश मुलांना आणि मुख्य म्हणजे पालकांनासुद्धा दात कसे घासावे याचीही माहिती नसल्याचे डॅाक्टर स्वामी यांनी सांगितले आहे.

 (हेही वाचा :  मिलींद तेलतुंबडेने चळवळीचा पैसा गाडला जमिनीत! नक्षलवाद्यांकडून शोधाशोध )

…तर स्वरयंत्रावर परिणाम

दुधाचे दात पडण्याचे योग्य वय हे आठ ते नऊ वर्षांचे असल्याने जर यापूर्वीच दात पडत असतील, तर पुढचे येणारे दात कधी गालातून, स्नायूतून येतात आणि त्यांची रचना ही वाकडीतिकडी असते. त्यामुळे याचा परिणाम मुलांच्या स्वर यंत्रणेवरदेखील होतो. उशिरा येणारे दात हे वाकड्या पद्धतीचे असल्याने मुलांना बोलण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, असे डॅाक्टरांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.