महाराष्ट्रातील हॉटेल्सना मिळणार औद्योगिक दर्जा, असा करा अर्ज

महाराष्ट्र पर्यटनाच्या वतीने महाराष्ट्रातील हॉटेल्सना औद्योगिक दर्जा देण्यासाठी तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागातर्फे 3 आणि 4 ऑगस्ट, 2022 रोजी पहिली तपासणी मोहीम सुरु होईल. पुणे विभागात जून 2021 पासून एकूण 181 अ-वर्गीकृत हॉटेल्सनी नोंदणी व अर्ज केले आहेत, येत्या दोन दिवसीय सत्रात तपासणी समिती आणि नियुक्त एजन्सीतर्फे या हॉटेल्सची पाहणी केली जाईल.

( हेही वाचा : बेस्टचे बंद केलेले बसमार्ग पुन्हा सुरु होणार?)

महाराष्ट्र सरकारने एप्रिल 1999 मध्ये आदरतिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा दिला होता, परंतु हा निर्णय केवळ कागदोपत्री उरला आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही. 2020 मध्ये, राज्य सरकारने अ-वर्गीकृत हॉटेल्ससाठी औद्योगिक दराने कर आणि शुल्क आकारण्याचे निकष जाहीर करताना शासन निर्णय (जीआर) जारी केला व, अ-वर्गीकृत हॉटेल्सना नोंदणी करून लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. सदर आवाहनाच्या नंतर वेबसाईटवर मोठ्या संख्येने नोंदणी प्राप्त झाल्यामुळे, तपासणी समिती अर्जदारांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यास सुरुवात करत आहे.

कशी असेल तपासणी समिती?

तपासणी समितीच्या माध्यमातून पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक, अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चे प्रादेशिक प्रतिनिधी, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन (HRA) चे स्थानिक प्रतिनिधी आणि टूर ऑपरेटर असोसिएशन (TOA) चे प्रतिनिधी अर्जदार हॉटेल्सची पाहणी करतील. क्वालस्टार या एजन्सीने स्थळांची पाहणी करण्यासाठी नियोजन आराखडा तयार केला आहे ज्याचे पालन करणे समितीसाठी बंधनकारक असणार आहे.

डॉ. धनंजय सावळकर, सहसंचालक, पर्यटन संचालनालय (DoT) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात 446 अर्ज पर्यटन संचालनालयाकडे प्राप्त झाले आहेत. तपासणीनंतर, जर या हॉटेल्सने आवश्यक सर्व निकषांची पूर्तता केली तर ते औद्योगिक दर्जा मिळण्यास पात्र असतील. यामुळे नोंदणीकृत हॉटेल्सना औद्योगिक दरांनुसार वीज शुल्क, पाणी पट्टी, मालमत्ता कर आणि अकृषिक कर उपलब्ध होतील.”

३ ऑगस्ट पासून पर्यटन संचालनालयातर्फे तपासणी सुरु, असा करा अर्ज

जर आपणही संबंधित फायदे मिळवण्यासाठी इच्छुक असाल आणि अजूनही अर्ज केला नसेल तर महाराष्ट्र्र पर्यटन विभागात अर्ज दाखल करू शकता, अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटनाच्या https://www.maharashtratourism.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करा, असे आवाहन पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी केले आहे.

औद्योगिक सवलती या अर्जदार हॉटेलच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या तारखेपासून लागू होतील. इच्छुक हॉटेल व्यावसायिकांनी सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर निकष तपासून अर्ज करावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here