-
ऋजुता लुकतुके
आयटीसी या मुख्य कंपनीपासून नुकताच वेगळा झालेला आयटीसी हॉटेल्स हा शेअर आता पूर्वनिर्धारित योजनेप्रमाणे मुंबई शेअर बाजारातील सर्व निर्देशांकांमधून हटवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात मुख्य कंपनी आयटीसीमधून हा शेअर वेगळा करण्यात आला. आधीच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक १० आयटीसीच्या शेअरमागे १ आयटीसी हॉटेलचा शेअर मिळाला. आणि २९ जानेवारीला हा शेअर १८८ रुपयांवर मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणीकृत झाला. (ITC Hotels Share Price)
पण, तेव्हापासून या शेअरमध्ये पडझड सुरू आहे. शेअरमधील नियमित व्यवहार सुरू होईपर्यंत आयटीसीप्रमाणेच हा शेअरही मुंबई शेअर बाजारांच्या काही निर्देशांकांमध्ये होता. सेन्सेक्स आणि सेन्सेक्स मिड-कॅप या निर्देशांकांमध्ये आयटीसी हॉटेल्सचाही समावेश होता. पण, आता तो इथून हटवण्यात आला आहे. ही एक नियमित प्रक्रिया आहे. (ITC Hotels Share Price)
मूळातच नोंदणी झाल्यानंतर या शेअरमधील पडझड थांबलेली नाही. मूळ किमतीपेक्षा हा शेअर सध्या १६ अंशांनी खाली आला आहे. किंबहुना लोअर सर्किट लागत असल्यामुळेच हा शेअर निर्देशांकांमधून हटवण्याची प्रक्रिया लांबली. अखेर ५ फेब्रुवारीला ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अर्थसंकल्पानंतर या शेअरमध्ये नियमित हालचाल सुरू झाली आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना शेअरमध्ये मामुली तेजी होती आणि ०.३४ टक्क्यांच्या वाढीसह शेअर १७२ अंशांवर बंद झाला आहे. (ITC Hotels Share Price)
(हेही वाचा – IPL 2025 : साईराज बहुतुले राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक)
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पर्यटनावर विशेष भर दिला आहे आणि त्यामुळे देशातील पंचतारांकीत हॉटेलची मागणी येणाऱ्या काळात वाढत जाणारी आहे. त्यामुळे आयटीसी हॉटेल्सची कामगिरीही चांगली असेल असा जाणकारांचा अंदाज आहे अर्थात, शेअर नुकताच नोंदणीकृत झाल्यामुळे तांत्रिक अभ्यासासाठी पूर्वीचे आकडे अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे देश तसंच परदेशातील मोठ्या संशोधन संस्थांनी या शेअरचा अभ्यास अजून सुरू केलेला नाही. पण, मेहता इक्विटीजचे प्रशांत तापसे यांनी आयटीसी हॉटेल्सबद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं आहे. (ITC Hotels Share Price)
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय असल्याचं त्यांचं मत आहे. पुढच्या एका वर्षांत हा शेअर २५० ते ३०० रुपयांची मजल मारू शकतो, असा त्यांचा अंदाज आहे. (ITC Hotels Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी वा गुंतवणुकीवर सल्ला देत नाही. लेखातील मतं जाणकारांची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community