खेळताना रंग बाई होळीचा होळीचा…

213

होळी… सण रंगांचा, अपरिमित उत्साहाचा अन् धमाल मौज-मस्तीचा… सण काळवंडलेल्या जीवनात सप्तरंग भरणारा, नाराजांच्या मनधरणीची संधी अन् जगण्याला नवी ऊर्जा देणारा… अशा या बहुरंगी-बहुढंगी उत्सवाची  चित्रपटसृष्टीला भुरळ पडली नसती तरच नवल!

अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपटांत होळी आणि धुळवडीचा व्यवस्थित वापर केला गेला आहे. यांतील काही दृष्य आणि गाण्यांनी केवळ अपार लोकप्रियताच मिळवली नाही, तर ती चित्रपटसृष्टीचा एक अविभाज्य घटक बनली. त्यामुळेच होळी जवळ आली की, रेडिओपासून रेस्टोपबपर्यंत चित्रपटांतील होळीच्या धमाल गाण्यांचे बोल कानावर पडू लागतात. अर्थात, यंदाचे वर्षही त्याला अपवाद नसेल.

खरेतर मानवी जीवनाचे प्रतिबिंबच कल्पकतेची जोड देऊन चित्रपटांत रेखाटले जाते. त्यामुळे आपल्याच आयुष्यातील विविध छटा पडद्यावर दिसतात. पण होळीच्या चित्रपटांतील ‘एण्ट्री’मागे थोडासा रंजक इतिहास आहे. ४०च्या दशकात मानवी भावनांचे मुक्त प्रकटीकरण होत नसे. अनेक सामाजिक बंधने त्यावेळी होती. साहजिकच उघड रोमान्स त्याकाळी निषिद्ध होता. पण होळी हा असा उत्सव आहे, ज्यामध्ये एकसुरी दिनक्रमातून थोडा विरंगुळा म्हणून एक दिवस केवळ आरडाओरडा, नाचगाणे आणि मौज-मस्तीची मुभा पूर्वीपार देण्यात आली आहे. नेमका हाच धागा पकडून लेखक-दिग्दर्शकांनी होळीला मोठ्या पडद्यावर आणले. कारण मुक्त मस्तीवर बंधन असणाऱ्या त्या काळात नायक-नायिकेचा प्रणय किंवा लाडीक छेडछाड दाखवण्यासाठी याहून उत्तम पर्यायच नव्हता. त्यामुळे वर्षातून दोन-चार चित्रपटांत तरी होळीचे रंग उधळले जात असत. अगदी ‘मदर इंडिया’ (होली आई रे कान्हाई…) ते अलिकडच्या ‘मंगल पांडे’सारख्या (होली आयी, रंग फूट पडे…) वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनाही हा मोह आवरला नाही. अर्थात, होळी सणाचा पायाच मुक्त अभिव्यक्तीवर आधारलेला असल्याने चित्रपटकर्त्यांच्या या खेळीला विरोध झाला नाही. उलट ती उत्तरोत्तर लोकप्रिय होत गेली.

mother indai

मेहबूब खान यांच्या औरत (१९४०) चित्रपटात पहिल्यांदा होळी रूपेरी पडद्यावर साजरी केल्याचे सांगितले जाते. यात एक नव्हे तर ‘जमुना तट श्याम खेले होली’ आणि ‘आज होली खेलेंगे साजन के संग’ अशी दोन गाणी होती. परंतु ती तितकी नावीन्यपूर्ण वाटली नाहीत. होळीचं पहिले दखलपात्र गाणे ठरले ते ‘जोगन’मधले (१९५०) ‘डारो रे रंग रसिया, फागून के दिन आये रे’, तर होळीचे पहिले हिट गाणे ठरण्याचा मान दिलीपकुमार, प्रेमनाथ, निम्मी आणि नादिरा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या आन (१९५२) चित्रपटातल्या ‘खेलो रंग हमारे संग, आज दिन रंग रंगिला आया’ या गाण्याला. त्यानंतर एकाहून एक सरस होळीगीतांचा बॉलीवूडने सपाटाच लावला.

aurat

‘आज ना छोडेंगे बस हमजोली’ (कटी पतंग-१९७०), ‘होली के दिन दिल मिल जाते है’ (शोले-१९७५), ‘रंग बरसे भिगे चुनरवाली’ (सिलसिला-१९८१), ‘अंग से अंग लगाना’ (डर-१९९३) ‘सोनी सोनी अंखियों वाली’(महोब्बते-२०००), ‘होली खेले रघुविरा’ (बागवान-२००३) आणि ‘डू मी अ फेव्हर, लेट्स प्ले होली’ (वक्त-२००५) यांसारख्या गाण्यांनी होळींच्या नव्या-जुन्या आठवणींना वेळोवेळी उजाळा दिला. या गाण्यांचे महत्त्व इतके अबाधित आहे की, होळीचा उत्सव त्यांचे शब्द-सूर कानी पडल्याशिवाय जणू पूर्णच होत नाही.

rang

रोमँटिक गाणी आणि दिलखेचक नृत्याच्या पुढे जाऊन विविध भावना प्रकट करण्यासाठीही बॉलीवूडकरांनी होळीचा यशस्वी वापर केल्याचे दिसते. मुख्यत्वे होळीची मौज-मस्ती ऐन रंगात आली असताना, अचानक एखादा आघात किंवा थरार आणून क्षणार्धात रंगाचा बेरंग करणे हा जणू अनेकांचा आवडता पॅटर्न. शोले, दामिनी (१९९३) किंवा डर ही याची सर्वांत बोलकी उदाहरणं. धर्मेंद्र-हिमा मालिनीची धमाल-मस्ती आणि अमिताभ-जयाच्या मूक प्रणयानं ‘शोले’मध्ये होळीचा रंग चढला असतानाच अचानक गब्बर सिंगची एण्ट्री होते व आंनदाचे रूपांतर क्षणार्घात भयामध्ये होते. ठाकूर अपंग असल्याचेसुद्धा याचवेळी स्पष्ट होते. दुसरीकडे होळीच्या रंगात सर्वजण बेधुंद असताना दामिनीचा दीर व त्याचे मित्र मोलकरणीला शिकार बनवतात आणि चित्रपटातील पात्रांसह प्रेक्षकही या दृष्याने काही क्षणांत अस्वस्थ होतात. ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय झालेल्या ‘डर’मध्ये विवाहित किरणच्या (जुही चावला) प्रेमात वेडापिसा झालेला राहुल (शाहरूख खान) होळीची संधी साधूनच तिच्यापुढं आपल्या मनातली भावना व्यक्त करतो. त्यानंतर सुनील मल्होत्रा (सनी देओल) आणि त्याच्यातील थरारक पाठलाग जिवाची घालमेल करतो.

sholay

रूक्ष जीवनी रंग

holi 5544
पतीच्या अकाली मत्यूमुळे उद्ध्वस्त, बेरंग झालेल्या विधवांच्या आयुष्यात होळीच्या माध्यमातून सप्तसंग भरण्याचा यशस्वी प्रयत्न बॉलीवूडमध्ये वारंवार झाला आहे. मागास समाजव्यवस्थेच्या भीतीने आपल्या सुप्त भावना मनातच दाबून ठेवलेल्या अशा नायिकांचे आयुष्य पुनरुजीवित करण्यासाठी होळीसारखा दुसरा उत्तम उत्सव कोणता होऊ शकतो? हुशार दिग्दर्शकांनी हे अचूक हेरले आणि वेळोवेळी पडद्यावर चितारले. ‘कटी पतंग’मध्ये राजेश खन्ना कठोर समाजव्यवस्थेच्या जोखडाखाली मन मारून दु:खी जीवन व्यथित करणाऱ्या आशा पारेखच्या जगण्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतो तो ‘आज ना छोडेंगे..’ गाण्यातून, तर ‘धनवान’(१९८१) मध्येही सफेद साडी गंडाळून निरस आयुष्य जगणाऱ्या रिना रॉयलादेखील ‘मारो भर भर भर पिचकारी…’ म्हणत राजेश खन्नाच नवी उभारी देण्याच्या प्रयत्न करतो. ‘फूल और पत्थर’मध्ये (१९६६) धर्मेद्र विधवा मीनाकुमारीवरील आपले प्रेम व्यक्त करतानाच ‘लायी है हजारो रंग होली’ म्हणत तिला समाजाचे बंधन झुगारून नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी जणू आर्जव करतो, तर ‘दिवाना’मध्ये (१९९२) शाहरूख खान कथित विधवा दिव्या भारतीला होळीनिमित्त दिला तुझे आयुष्यही असेच सप्तरंगी होऊ शकेल, असेच जणू सांगण्यासाठी तिच्या घरात प्रवेशतो.

आनंदापासून दु:खापर्यंत…

zakhmi
आनंदापासून पराकोटीच्या दु:खापर्यंत जवळपास सर्वच भावना व्यक्त करण्याची क्षमता होळीमध्ये असून, चित्रपट निर्मात्यांनी सातत्यानं ते दाखवून दिले आहे. ‘जख्मी’मध्ये (१९७५) गुन्हेगारांच्या शोधात असलेला सुनील दत्त त्वेषाने ‘दिल मे होली जल रही है’ म्हणत आपल्या रागाला वाट मोकळी करून देतो, तर ‘कामचोर’मध्ये (१९८२) ‘मल दे मोहे गुलाल..’ गाण्याद्वारे पतीपासून दुरावलेल्या जया प्रदाचे दु:खं व्यक्त होते. ‘सौतन’मधील (१९८३) ‘मेरी पहेली ही तंग थी चोली..’ गाणं राजेश खन्ना आणि टिनामधील लडीवाळ मस्ती अतिशय उत्कटपणे पडद्यावर साकारते, तर ‘फागुन’मध्ये (१९५८) पतीने महागडी साडी होळीच्या रंगाने भिजवल्यानंतर ‘पिया संग खेलू होली…’ म्हणणारी वहिदा धर्मेंद्र अतिशय कठोर शब्दांत सुनावते आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो.

पुनर्मिलन… आनंद… प्रणय…

rang barse
होळीचा आधार घेऊन हतबलता प्रकट करण्यातही दिग्दर्शकांना खूप छान जमले आहे. ‘सिलसिला’ आणि ‘आखिर क्यूँ’ (१९८५) ही याची उत्तम उदारणे. पैकी ‘सिलसिला’मध्ये पूर्वाश्रमीचे प्रेमी (अमिताभ-रेखा) ‘रंग बरसे…’ म्हणत परस्परांच्या पती किंवा पत्नीसमोर (जया भादुरी-संजीव कुमार) मस्ती करत असतात. मात्र त्यांना केवळ पाहत बसण्याशिवाय ते दोघे काहीच करू शकत नसतात. ‘आखिर क्यूँ’मध्येही स्मिता पाटील पती राकेश रोशनचा तिची बहीण टिना मुनिमकडील ओढा ‘सात रंग में खेल रही है…’मधून पाहत असते, परंतु काहीच करू शकत नसते. याव्यतिरिक्त विनोद, पुनर्मिलन, आनंद, प्रणय अशा विविध घटकांसाठी होळी लेखक-दिग्दर्शकांच्या मदतीला वेळोवेळी धावून आली आहे. ‘नमक हराम’मध्ये (१९७३) ‘नदिया से दरियाँ..’नंतर भांग प्यायलेल्या राजेश खन्ना आणि आसराणी यांच्यातील धमाल विनोदी दृष्य प्रेक्षकांना मनसोक्त हसवतं, तर ‘सौदागर’मध्ये (१९९१) ‘इमली का बुटा’ म्हणत दिलीप कुमार आणि राजकुमार मैत्रीतील अनेक वर्षांपासूनचा दुरावा नष्ट करतात. होळी उत्सवाच्या सुरेख वापराचे हा चित्रपट एक उत्तम उदाहरण ठरावा.
‘बागवान’मध्ये (२००३) अमिताभ बच्चन यांनी ‘होली खेले रघुविरा…’म्हणत होळीचा आनंदोस्तव नव्या दमाने साजरा केला, तर ‘वक्त’मध्ये अक्षय कुमार-प्रियंका चोप्रा या जोडगोळीने बऱ्याच खंडानंतर ‘डू मी अ फेवर..’ म्हणत पदद्यावर प्रणयाचे रंग उधळले.
holicha rang
होळी किंवा धुळवड साजरी करताना प्रामुख्याने हिंदी गाणी वाजवली जात असली तरी मराठीतही होळी किंवा रंगपंचमीविषयक अनेक सुंदर गाणी आहेत. ‘आई’ चित्रपटात अभिनेत्री लीला गांधी यांच्यावर चित्रित झालेले ‘नटून थटून पंचीम आली औंदाच्या ग साली’, ‘सुशिला’ चित्रपटातील ‘आली रे आली पंचिम आली’, ‘गोंधळात गोंधळ’मधील ‘अगं नाच नाच राधे उडवू या रंग’, ‘सामना’मधील ‘सख्या चला बागामंदी रंग खेळू चला’ आणि ‘ह्योच नवरा पाहिजे’ चित्रपटातलं ‘होळीचं सोंग घेऊन लावू नको लाडीगोडी’सह ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, ‘खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा’, ‘नेसते नेसते पैठणी चोळी गं आज होळी गं’, ‘आज होळीचा रंग लुटा रं, लुटा रं लुटा होळीचा रंग लुटा रं’ व ‘होळीचा डंका पेटलीय लंका’ ही गाणी विशेष लोकप्रिय आहेत.
चला तर मग आपणही यंदाच्या होलिकोस्तवात अशुभ, काळ्या, वाईट गोष्टींचे दहन करून स्नेहाचे, मस्तीचे रंग उधळूयात!
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.