यंदाची होळी खास असणार आहे, कारण दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर यंदा निर्बंधमुक्त होळी खेळता येणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने, सरकारने जवळजवळ सगळे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे यंदाची होळी एकदम जल्लोषात साजरी केली जाणार आहे. होळी जवळ आली की, हिंदी चित्रपटातील अनेक गाणी ऐकू येऊ लागतात. यावर्षी १८ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. संपूर्ण देशात होळी आणि धुलीवंदन साजरे केले जाते. होळी हा सर्वांच्या आवडत्या सणांपैकी एक आहे. वेगवेगळ्या रंगांसोबत केली जाणारी मजामस्ती कोणाला आवडत नाही? परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की होळी नेहमी ‘रंगांचा सण’ म्हणूनच का साजरी केली जाते? होळीला रंग खेळण्याची प्रथा कधीपासून सुरु झाली?
होळीचे महत्त्व अनन्यसाधारण
दोन दिवसांवर आलेल्या या होळीच्या सणाची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. लहान मुलांनी तर आतापासून होळी खेळायला सुरुवात केली आहे. हिंदू सणांमधील एक प्रमुख सण असलेल्या या होळीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि शास्त्रिय महत्त्वही अनन्यसाधारण आहे. संपूर्ण देश होळीच्या नानाविध रंगात न्हाऊन निघतो. अशाच रंगात रंगण्यामागचं कारण आपण जाणून घेऊया.
( हेही वाचा होळीच्या सणाला पाण्याने भरलेले फुगे, पिशव्या मारताय? तर वाचा राज्य सरकारची नियमावली )
…म्हणून होळीला रंग खेळण्याची प्रथा प्रचलित
होळी हा रंगांचा सण म्हणून साजरा करण्याची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून झाली. भगवान श्रीकृष्णाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्ण मथुरेत रंगांनी होळी साजरी करायचे आणि तेव्हापासून होळी हा रंगांचा सण म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. ते वृंदावन आणि गोकुळमध्ये मित्रांसोबत होळी खेळायचे. हळूहळू या उत्सवाला सामुदायिक कार्यक्रमाचे स्वरूप आले. हेच कारण आहे की आजही वृंदावनात होळीचा उत्सव अतुलनीय आहे आणि आता जगात सर्वत्र लोक आपापल्या पद्धतीने होळी खेळतात आणि आपापसातील कटुता संपवून मैत्रीपूर्ण राहतात.
Join Our WhatsApp Community