गेल्या अडीच वर्षांतील कोरोनाकाळात हालचाली मंदावलेल्या किशोरवयीन मुलांना आता हमखास स्थूलतेचा आजार ग्रासलेला असताना आता मधुमेहाची लागण वाढत आहे. आठ ते बारा वयोगटातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्राथमिक लक्षण गेल्या दोन वर्षांतच पाच टक्क्यांनी वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ही स्थिती आटोक्यात येण्यासारखी असून, व्यायाम आणि जंकफूडला कात्री लावून डायबिसीटी एकत्र येत असल्याचा आजार किशोरवयीन मुलांपासून रोखा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. डायबिसीटी आताच नियंत्रणात आणली नाही तर पुढील दहा वर्षांत तरुणवयात या मुलांना असंख्य आजारांचा सामना करावा लागेल, अशी भीतीही डॉक्टरांनी व्यक्त केली.
मुंबईतील परळ येथील केईएम या पालिकेच्या रुग्णालयांतील मधुमेहतज्ज्ञ डॉ व्ही. शिवणे यांनी किशोरवयीन मुलांमधील मधुमेहाच्या प्राथमिक स्तरावरचे प्रमाण आता तीस टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती दिली. उच्च मध्यमवर्गीय तसेच मध्यमवर्गीय कुटुंबीयांतील मुलांमध्ये कोरोनाकाळात मधुमेहाची प्राथमिक पातळी आढळण्याचे प्रमाण वाढल्याचेही ते म्हणाले. कोरोनाकाळातील जीवनशैली, ऑनलाईन जंकफूड खाण्याच्या सवयीत मुलांमध्ये स्थूलता वाढली आणि त्याचसह या मुलांच्या शरीरातील साखरेचे प्रमाणही अनियंत्रित व्हायला सुरुवात झाले.
आठ ते दहा वर्षांच्या मुलांमध्ये तीस ते पंचेचाळीस किलोचे वजन हमखास आढळून येत आहे. या मुलांमध्ये मंदावलेली हालचाल पाहता व्यायामाचा भरपूर आळस दिसून येतोय. या प्रकाराने कंटाळलेल्या पालकांनी स्वतःच्या सवयी बदलण्याचे आवाहन डॉ व्ही. शिवणे करतात. मुले पालकांचे अनुकरण करतात. पालकांनी व्यायाम करायला सुरुवात केली तर मुलेही व्यायामाला सुरुवात करतील.
वेळीच मुलांमधील मधुमेहाची लक्षणे कशी ओळखायची
मुलांची मान काळी पडली असेल तर मुलांमध्ये मधुमेहाला सुरुवात झालीच समजा. हे लक्षण प्रामुख्याने मधुमेहाचे मानले जाते.
(हेही वाचा–एफडीएची रिलायन्सच्या दुकानात धडकसत्र)
कोणत्या तपासण्या कराव्यात
सोनोग्राफी, एचबीएवन सी (शरीरातील हिमोग्लोबीनशी निगडीत रक्तातील ग्लुकोजची मात्रा जाणून घेण्याची रक्ततपासणी), कोलेस्ट्रोल, यकृताचीही तपासणी करावी.
डायबीसीटी म्हणजे नक्की काय
स्थूलता आणि मधुमेह एकत्रित झाल्यास त्याला वैद्यकीय भाषेत ‘डायबीसीटी’ असे संबोधले जाते. लहान मुलांमध्ये वाढती स्थूलता ही अनुवंशिकतेनेही येत असल्याचे आता सिद्ध होत आहे. त्यासाठी लहान मुलांना वेळीच निरोगी आरोग्यासाठी सकस आहार आणि व्यायामाची सवय लावल्यास डायबीसीटीपासून दूर ठेवता येईल, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.
हा आजार टाळण्यासाठी पालक व शाळेची सामूहिक जबाबदारी
डायबिसीटी हा आजार टाळण्यासाठी आताच्या मुलांच्या खाण्यातून जंकफूड काढायला हवे. त्यासाठी पालकांसह शाळांनीही पुढाकार घ्यायला हवा. शाळेत तसेच घरात मुलांना चपाती-भाजी, उसळ, उकडलेली अंडी, फळे, ताक आदींचा अन्नात समावेश करावा. तसेच मुलांना पाचवीपासूनच प्रत्येक उपलब्ध अन्नातील कॅलरिजची मात्रा वाचण्याची सवय लावायला हवी. यासाठी शाळा मुलांना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून ही सवय अंगीकारायला मदत करु शकतात, असा सल्ला मधुमेहतज्ज्ञ डॉ व्ही शिवणे देतात.
मधुमेह टाईप २ चा विळखा
किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेहाचा दुसरा प्रकार लक्षणीय प्रमाणात दिसत असल्याची माहिती मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयाच्या डॉ स्वेता बुदियाल देतात. मधुमेहाचा दुसरा प्रकार हा चुकीच्या जीवनशैलीचा आजार म्हणून संबोधले जाते. गेल्या दहा-बारा वर्षांत तिशीतील माणसांमध्ये मधुमेह आढळत होता. आता पौंगडावस्थेतील मुलांमध्येही हमखास मधुमेहाचा आजार दिसत असल्याची माहिती डॉ बुदियाल यांनी दिली.
कसे वाढत गेले किशोरवयीन आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण –
२०१४ साली दिल्लीतील केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य खात्याशी संबंधित भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाने २०१४ साली किशोरवयीन मुलांमधील मधुमेहाच्या दुस-या प्रकारावरील अहवाल प्रकाशित केला होता. यात २५ टक्के मुलांमध्ये मधुमेह आढळून आला होता. हे प्रमाण तीन टक्क्यांनी कोरोनापूर्वी वाढले. कोरोनाच्या दोन वर्षांत थेट २५ टक्क्यांवरुन ३० टक्क्यांपर्यंत प्रमाण वाढले.