बाजारात रंगीबिरंगी, विविध आकार आणि प्रकारच्या छत्र्या विकायला येतात. त्यांची खरेदीही फार चोखंदळपणे केली जाते. तसे पाहिले तर छत्रीचा वापर आपण केवळ पावसाळ्यात तीन-चार महिनेच करतो. इतरवेळी छत्री कुठेतरी अडगळीत, माळ्यावर, कोपऱ्यात पडलेल्या किंवा अडकवून ठेवलेल्या असतात. छत्रीच्याबाबतीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे छत्री आज आपण पावसापासून संरक्षण करण्यासाठी वापरत असलो, तरी छत्रीची निर्मिती ही उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाली होती. Umbra म्हणजे सावली. सुर्याच्या प्रखर किरणांपासून, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर प्रथम सुरु झाला होता.
प्राचीन इजिप्तमध्ये तेथील गुलाम आपल्या मालकाच्या डोक्यावर सावली यावी म्हणून, वापरत असलेल्या आच्छादनाच्या ‘छत्रा’ पासून छत्रीचा उगम झाला असल्याचे इतिहास सांगतो. पुर्वीचे राजे महाराजे आपल्या लवाजमासह रथातून, हत्तीवरील अंबारीतून निघत तेव्हा त्यांचे सेवक सतत त्यांच्या डोक्यावर छत्री धरून असलेले जुन्या चित्रात दिसतात. तर त्या काळातल्या महाराण्या ऊन आणि उष्णतेपासून स्वतःच्या संरक्षणासाठी छत्री वापरत असत.
सर्वप्रथम फ्रान्समध्ये छत्रीचा वापर पावसासाठी केला गेला
पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा उपयोग सर्वप्रथम युरोपमधील फ्रान्समध्ये सतराव्या शतकात करण्यात आला. जोन्स हँन्वे हे पर्शियन लेखक,पर्यटक म्हणून लंडनला गेले होते. ते लंडनमध्ये नेहमी छत्री सोबत घेऊन फिरत. उन्हाबरोबरच पावसापासूनही संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर होऊ शकतो, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
‘चीन’ छत्रीचे माहेरघर
चीनला छत्रीचे माहेरघर समजले जाते. पुर्वी चीनमध्ये घरोघरी छत्र्या बनवल्या जात. बाबुंच्या काट्याच्या फ्रेम बनवून त्यावर हाताने रंगवलेली पानेफुले, पक्षी, विविध नक्षी काढलेले कापड लावले जाई. त्यावर तेलाचा थर दिला जाई. या छत्र्या खूप सुंदर दिसत आणि खूप टिकाऊ असत.
( हेही वाचा: Gmail वापरताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा, अन्यथा तुमचे Account होऊ शकते बॅन )
जपानला नव्या फॅशनच्या छत्र्या वापरण्याची भारी हौस
छत्री आवडणारा दुसरा देश म्हणजे जपान. चीनमधून युरोप आणि जपानमध्ये छत्र्यांचा प्रसार झाला. जपानमध्ये रंगीबिरंगी आणि विविध माॅडेलच्या छत्र्या वापरण्याची भारी हौस आहे. एवढेच नाही तर छत्री हा त्यांच्या राष्ट्रीय पोषाखाचा भाग बनला आहे. चीनप्रमाणेच जपानमध्येसुध्दा पुर्वी नैसर्गिक साधनांपासुन छत्र्यांची निर्मिती केली जात होती. बांबूचे दांडे व झाडांच्या तुंतीपासून कापड बनवून त्यापासून आकर्षक छत्र्या बनवल्या जात.
अशी आली भारतात छत्री
भारताबद्दल सांगायचे तर ब्रिटिश लोकांबरोबर छत्री भारतात आली. ‘इब्राहिम कुरीम अँड सन्स’ या ब्रिटिश छत्री उत्पादन कंपनीने भारतात जोरदार छत्री विक्री केली. त्या अगोदर पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी ‘इरले’ वापरत असत. तेही नैसर्गिक साधनांपासूनच बनवले जाई. बांबुच्या सुपासारख्या आकाराच्या सांगाड्यावर पळस किंवा इतर रुंद पानांचे आच्छादन लावून ते डोक्यावर घातले जाई. शेतीची कामे करताना आजही ग्रामीण भागात ते मोठ्या प्रमाणात वापरले जाते. एकोणिसाव्या शतकात इंग्रजांच्या काळात भारतात छत्र्या बनवण्याचा कारखाना सुरू झाला. त्यासाठी लागणारा कच्चा माल आयात केला जाई. इंग्लडमधून सुबक छत्र्यांची आयातही होत असे, पण त्या महाग असल्याने फक्त ब्रिटिश लोकच वापरत असत.
छत्रीशिवाय पावसाची मजा नाहीच
जगातील पहिले छत्री विक्रीचे दुकान ‘जेम्स स्मिथ अँड सन्स’ हे १८३० साली इंग्लंडमध्ये सुरु झाले होते. छत्री हरवली, सापडली, विसरली, दिली, घेतली, छत्री वाऱ्याने उलटी होऊन झालेली फजिती, तसेच पावसात एका छत्रीत दोघांनी भिजण्याचा घेतलेला आनंद हे सर्व संमिश्र भाव मनात घोळवत छत्री खरेदी केली जाते. एका छत्रीने आपल्या प्रत्येकाच्या जीवनात निर्माण केलेला हा निखळ आणि मोठा आनंद दरवर्षी वाढतच असतो. कारण छत्रीशिवाय पाऊसाची मजा नाहीच.
Join Our WhatsApp Community