कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला उपद्रवकारक ठरणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी कोकण रेल्वेतर्फे साडेसहा लाखाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले. गेल्या वर्षीपासून टप्प्याटप्प्याने विजेवरच्या गाड्या धावू लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्युतीकरण विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल कोकण रेल्वेची प्रशंसा केली.
( हेही वाचा : लष्करी हेलिकॉप्टरच्या अपघातातील दोन्ही पायलटचा मृत्यू )
विद्युतीकरणासाठी उभारलेल्या खांबांवर जवळपासच्या रानातील माकडे उड्या मारू लागल्याने कोकण रेल्वेला त्यांना रोखण्यासाठी लाखो रुपयांची निविदा काढावी लागली आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते राजापूर या विभागातील ओएचई पोर्टल्सवर माकडे चढून उड्या मारू लागल्याने या विभागात विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या प्रवासात व्यत्यय निर्माण होऊ लागला आहे. रेल्वे गाड्या चालतात, त्या ओव्हरहेड वायरमधून अतिउच्च क्षमतेचा विद्युत प्रवाह सुरू असतो. त्याच वायरवर माकडांचा वाढलेला उपद्रव कोकण रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे.
माकडांमुळे रेल्वेच्या विद्युत प्रवासात खंड पडू नये, वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी कोकण रेल्वेने ६ लाख ६२ हजार ६६३ रुपयांच्या अंदाजित खर्चाची निविदा काढली आहे. कोकण रेल्वेच्या माकडप्रवण भागामध्ये माकडांना रोखण्यासाठी रत्नागिरी ते राजापूर या भागात अँटी क्लाइंबिंग उपकरणे कोकण रेल्वेला बसवावी लागणार आहेत.