- ऋजुता लुकतुके
देशातील चौथ्या मोठ्या खाजगी बँक कोटक महिंद्राने स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेकडून त्यांचा ३,३३० कोटी रुपयांचा वैयक्तिक कर्जाचा पोर्टफोलिओ विकत घेतला आहे. शुक्रवारी हा व्यवहार पूर्ण झाल्याचं बँकेनं सर्व शेअर बाजारांना कळवलं आहे. ऑक्टोबर २०२४ मध्येच या व्यवहाराबद्दल पहिली बातमी आली होती आणि बँकेचे उत्पादन प्रमुख अंबुज चंदना यांनी कर्ज व्यवसाय वाढवण्याची मनिषा तेव्हाच बोलून दाखवली होती. सुरुवातीला स्टॅनचार्ट बरोबरचा हा व्यवहार ४,१०० कोटी रुपयांचा होता. पण, मधल्या काळात काही कर्जदारांनी आपली देणी फेडून कर्जखाती बंद केली. त्यामुळे व्यवहार पूर्ण होईपर्यंत त्याचं मूल्य ३,३३० कोटी रुपयांवर आलं. (Kotak Bank Share Price)
ही बातमी शेअर बाजाराला कळल्यावर कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरना गुंतवणूकदारांकडून अर्थातच मागणी होती. पण, या आठवड्यात भारतीय बाजारांमध्ये परकीय गुंतवणूकदार संस्थांची विक्री सुरूच राहिल्यामुळे बँक कंपन्यांमध्ये बहुतांश मंदीचं वातावरण होतं आणि त्याचा फटका कोटक महिंद्रालाही बसला. मागच्या एका महिन्यात या शेअरमध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. पण, या आठवड्यात एकूण दीड टक्क्याची, तर शुक्रवारी ०.६५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर ११ अंशांच्या घसरणीसह १,८८३ रुपयांवर बंद झाला. (Kotak Bank Share Price)
(हेही वाचा – मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील Carnac Bridge चा दुसरा गर्डर शनिवारी रात्री बसवणार)
कोटक महिंद्रा बँकेनं डिसेंबर २०२४ तिमाहीचे आकडे जाहीर केले तेव्हा वैयक्तिक कर्जाचं प्रमाण बँकेच्या एकूण व्यवहारांमध्ये १०.५ टक्के इतकं होतं आणि आता ते टप्प्याटप्प्याने वाढवत नेण्याचा बँकेचा विचार आहे. ‘वैयक्तिक कर्ज आणि त्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांना बँकेकडे आकर्षित करणं ही आमची रणनीती आहे आणि त्यावर आम्ही शिस्तबद्ध काम करत आहोत. मध्यम व उच्च उत्पन्न गटातील पगारदार वर्गाला आम्हाला आमच्याकडे आणायचं आहे. आणि ते टप्प्याटप्प्याने आम्ही करू,’ असं चंदना मीडियाशी बोलताना म्हणाले. (Kotak Bank Share Price)
वैयक्तिक कर्ज फोलिओ हस्तांतरणासाठी रिझर्व्ह बँकेच्या अटी पूर्ण करून हा व्यवहार २३ जानेवारीला पूर्ण झाल्याचं चंदना यांनी म्हटलं आहे. (Kotak Bank Share Price)
(टीप-शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणुकदारांनी स्वत:च्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमधील गुंतवणुकीसाठी कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community