‘लेक लाडकी अभियान” हे दलित विकास महिला मंडळ या सातारा येथील संस्थेने २००४ साली सुरु केलेले अभियान आहे. या अंतर्गत गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्वपूर्ण काम केलेले आहे. मुलींची संख्या कमी होऊ नये. गर्भामध्ये त्यांना दुजाभावाने वागवले जाऊ नये, त्या केवळ मुली आहेत म्हणून स्त्रीभ्रूण हत्या करू नये म्हणून स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांना रंगेहाथ पकडून, गुन्हा दाखल केला जातो. यामुळे या कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी लेक लाडकी हे प्रभावी अभियान ठरले आहे. जागतिक महिला दिनी समस्त जगातील महिलांच्या समतेसाठी कटीबद्ध राहून काम करण्याचा निर्धार अभियानाने केला आहे.
डॉक्टरना रंगेहाथ पकडले
गर्भधारणा पूर्व आणि प्रसव पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा १९९४ सुधारित २००३ अंतर्गत लेक लाडकी अभियानाने २००४ पासून २०१९ पर्यंत ५० पन्नास वेळा बनावट गिराईक बनवून गरोदर मातेला गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांकडे पाठवून गर्भलिंग निदान करताना डॉक्टरांना रंगेहाथ पकडले. ५० पैकी १८ प्रकरणांमध्ये डॉक्टरांना शिक्षा झाली. हजारो मुली लेक लाडकी अभियानाने वाचवल्या म्हणून लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक अॅड. वर्षा देशपांडे (माजी सदस्या केंद्रिय गर्भलिंग निदान आयिग, भारत सरकार) यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मानाचा समजला जाणारा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते इंडिया टीव्हीच्या वतीने ब्रेवरी अवॉर्ड, ग्रेट वुमन, सावित्रीबाई फुले पुरस्कार, धनंजय थोरात पुरस्कार, माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या हस्ते धाडसी महिला पुरस्कार, स्वयंसिद्धा पुरस्कार, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या हस्ते सन्मानित केले आहे.
पुरस्कार सोहळा
याच लेक लाडकी अभियानांतर्गत भारतीय संविधान राष्ट्र गौरव पुरस्कार २०२१ चा पुरस्कार वितरण सोहळा २७ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात झाला. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा तसेच मुंबईच्या माजी महापौर अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर, होप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण निचत, कॉँग्रेसच्या पदाधिकारी तसेच महिला हक्क कार्यकर्त्या डॉ. मोनिका जगताप, मिसेस महाराष्ट्र २०२० वृषाली प्रवीण, अभिनेत्री जानकी पाठक, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक प्रसाद तारकर तसेच मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
नव्यानेच पारित झालेल्या शक्ती विधेयकाबद्दल सविस्तर माहिती
कार्यक्रमाची सुरूवात सर्व मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाली. राजेश जाधव यांनी सरनामा वाचन केले. तेजस्विनी डोहाळे यांनी प्रस्तावना केली तर मैत्री संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुरज भोईर यांनी लेक लाडकी अभियानाची भूमिका विषद केली. सत्काराला उत्तराला देताना अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी लेक लाडकी अभियानासाठी पोषक अशा नव्यानेच पारित झालेल्या शक्ती विधेयकाबद्दल सविस्तर माहिती दिली. लेक लाडकी अभियानांतर्गत महत्वपूर्ण कार्य करत असलेल्या मिसेस महाराष्ट्र २०२० वृषाली प्रवीण यांची लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. सदर नियुक्तीपत्र अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आले.
( हेही वाचा : सावध! डाएट आणि प्रोटीनसाठी सप्लिमेंट फूड खाताय? मग हे वाचा )
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांतून उल्लेखनीय कामगिरी करणार्या राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक तसेच प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजेश जाधव, वनिता तोंडवलकर, तेजस्विनी डोहाळे, विनायक जावळेकर, कपिल श्रीरसागर, संतोष भोईर यांचे विशेष सहकार्य लाभले.
Join Our WhatsApp Community