श्रीनगरमध्ये मल्टिप्लेक्सचा शुभारंभ; 30 वर्षांनी ‘सिल्व्हर स्क्रिन’वर सिनेमा

108

दहशतवादात होरपळून निघालेल्या जम्मू-काश्मिरात आता पुन्हा चांगले दिवस येऊ घातले आहेत. या राज्यात तब्बल 30 वर्षांनी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिन सिनेमा पहाता येणार आहे. श्रीनगर येथे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मंगळवारी मल्टीप्लेक्सचे उद्घाटन केले.

( हेही वाचा : ‘महापौर’ या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला दिली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस )

यापूर्वी देखील अनेकदा काश्मीरमध्ये सिनेमा हॉल सुरू करण्याचे प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नव्हते. श्रीनगरमध्ये सुरू झालेल्या मल्टिप्लेक्समध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट दाखवला जात आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा देखील प्रेक्षकांसोबत हा चित्रपट पाहिला. यावेळी मनोज सिन्हा म्हणाले की, आम्ही लवकरच जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यात सिनेमा हॉल बनवू. लवकरच अनंतनाग, बांदीपोरा, गंदरबल, डोडा, राजौरी, पूंछ आणि किश्तवाडमध्ये असे सिनेमा हॉल बांधले जातील. सिनेमा हे एक सशक्त सर्जनशील माध्यम आहे, जे लोकांची संस्कृती आणि मूल्ये प्रतिबिंबित करते. हे जगासाठी ज्ञान, नवनिर्मितीची दारे उघडते आणि लोकांना एकमेकांच्या संस्कृतीची चांगली समज देते असे सिन्हा यांनी सांगितले.

फारुख अब्दुल्ला सरकारने 1999 मध्ये सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. रिगल, नीलम आणि ब्रॉडवे सिनेमा हॉलमध्येही चित्रपट दाखवण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र रिगल सिनेमाच्या पहिल्या शोदरम्यान दहशतवादी हल्ला झाला. त्या घटनेत एक जण ठार आणि 12 जण जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहे बंद करण्यात आली. एकट्या श्रीनगरमध्ये 10 सिनेमा हॉल होते, ज्यामध्ये बॉलीवूडचे चित्रपट दाखवले जात होते. काश्मीरमधील अनेक जुनी चित्रपटगृहे नंतर रुग्णालये आणि व्यावसायिक केंद्रांमध्ये बदलली गेली किंवा सुरक्षा दलांसाठी तात्पुरती शिबिरे म्हणून वापरली गेली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.