बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात महिन्याभराची बिबट्याची पिल्ले वीकेण्डला दाखल झाली आहेत. नंदुरबारात जन्मलेली ही पिल्ले आईपासून विभक्त झाल्यानं त्यांची रवानगी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली आहे. महिन्याभराची असल्यानं त्यांच्या देखभालीसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या पुनर्वसन केंद्रात देखभालीसाठी त्यांना पाठवण्यात आलं आहे, मात्र सध्या तरी त्यांच्यावर प्राण्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
गेल्या महिन्यात ‘आरे’त माणसांवर हल्ला करणा-या ‘सी-३२’ या अडीच वर्षांच्या मादी बिबट्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ही पिल्ले शनिवारी सकाळी दाखल झाली आहेत. मुळात तीन पिल्ले नंदुरबार वनविभागाला सापडली होती. त्यांच्या तपासणीनंतर जिथं तीन पिल्लं सापडली, तिथं त्यांना रात्री ठेवण्यात आलं होतं. मात्र या तीन बिबट्यांची आई केवळ आपल्या एकाच पिल्लाला घेऊन गेली. दोन पिल्ले महिन्याभराचीच असल्यानं त्यांना जंगलात तसंच सोडल्यास भूकेमुळे त्यांचा मृत्यू होण्याचीही भीती होती. नंदुरबार वनविभागानं त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवले आहे.
( हेही वाचा: कोळी बांधवांच्या उपजिविकेचा अभ्यास करणार ‘टाटा’ संस्था )
मादी बिबट्याच्या पिल्लाची प्रकृती गंभीर
ही पिल्ले तीन दिवस काहीच खात नव्हती. नंदुरबारमध्ये त्यांना बकरीचं दूध पाजण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांची प्रकृती खालावल्यानं नर-मादी अशी दोन पिल्ले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आली. त्यांना सलाईन दिलं गेलं. पिल्ले छोटी असल्यानं सध्या रुग्णालयात ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी मादी बिबट्याच्या पिल्लाची प्रकृती गंभीर आहे.
राज्यात कुठे आहेत बिबट्या पुनर्वसन केंद्रे?
२०१५ साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मॅप्को परिसरातील विस्तीर्ण जागेत नवं बिबट्या पुनर्वसन केंद्र कार्यरत करण्यात आले. यात बिबट्यांना खेळण्यासाठी जागाही उपलब्ध करुन देण्यात आली. बिबट्या पुनर्वसन केंद्रात आईपासून हरवेली तसेच माणसावर हल्ला केल्यानं जेरबंद केलेल्या बिबट्यांची रवानगी केली जाते. राज्यात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पुण्यातील जुन्नर आणि नागपूरमधील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात हे बिबटे ठेवले जातात.