गेल्या काही वर्षापासून शेतीत उत्पन्न होत नसल्याने शेती करणे परवडत नाही म्हणूनच किराणा दुकानांना ज्याप्रकारे वाईन विकायची परवानगी देण्यात आली तशीच परवानगी आम्हालाही द्या अशी अजब मागणी भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली आहे. या अजब मागणीची भंडारा जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.
शासनाने तोडगा काढलेला नाही
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या निलज गावातील शेतकरी जयगुनाथ गाढवे यांनी हे पत्र पाठवले आहे. या परिसरात ऑक्टोबर 2021ला चक्रीवादळ आले होते. त्यात जयगुनाथ सह गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती भुईसपाट झाली, पंचनामे केल्यानंतर अनेक दिवस उलटले तरीही, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसान भरपाईचा लाभ मिळालेला नाही. या प्रकरणी गावातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडून तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली होती, तरी या विषयावर अजूनही शासनाने कोणताही तोडगा काढला नाही.
मुख्यमंत्र्यांना पत्र
या संपूर्ण अडचणींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक चटके बसत असल्याचे गाढवे यांचे म्हणणे आहे. शेतात पीक घेताना लागत असलेले खत, यूरिया व मिळत असलेले उत्पन्न यात तारतत्म्य नाही. दूसरीकडे मुलांचा शैक्षणिक खर्च, कुटुंबाच्या आरोग्यावर होणार खर्च या सर्व गोष्टी शेतीच्या उत्पन्नामधून करणे शक्य होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आपण किराणा दुकानात वाईन विकायची परवानगी दिली तशी मलाही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लवकरात लवकर वाईन विक्रीची परवानगी मिळावी अशी मागणी गाढवे यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. गाढवे यांनी हे पत्र स्पीड पोस्टने पाठवले आहे.
Join Our WhatsApp Community