गोवा म्हटलं की शांत, निसर्गरम्य आणि मनाला तजेला देणारे ठिकाण म्हणून गोवा सर्वांनाच आवडतो. तेथील भुरळ पडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे तेथील समुद्र किनारे जे स्वच्छ तर आहेतच पण त्याबरोबरच खिळवून ठेवणारे पण आहेत.
पण तुम्हाला माहितीय का? की गोव्यासारखेच समुद्रकिनारे महाराष्ट्रात आहेत. होय हे खर आहे, गोव्यातील बटरफ्लाय बीचसारखा आणि तेवढाच सुंदर असा समुद्रकिनारा महाराष्ट्रात आहे. तो ही अगदी सारख्या आकाराचा.
हा समुद्रकिनारा आहे रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील देवघळी बीच. वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर आणि समुद्रकिना-याचा पर्यटनदृष्ट्या झालेला विकास आदींमुळे गेल्या काही वर्षांमध्ये राजापूर तालुक्यातील कशेळी गाव पर्यटनस्थळ म्हणून प्रकाशझोतात आले आहे.
समुद्र किनारी नव्याने विकसित केलेला सनसेट पाॅईंट पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यातून हौशी पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून, कशेळी येथील देवघळी बीचवरील सनसेट पाॅईंटला सध्या टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून पहिली पसंती मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका हा सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेला आणि मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला तालुका आहे. देवघळी बीचवरील सनसेटपाॅईंटही चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात आला. सनसेट पाॅईंटला जाण्यासाठी चांगले रस्ते बनवण्यात आले. पथदीप, पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था आदी सुविधा निर्माण केल्या.
गोव्यातील बटरफ्लाय बीचसारखे अनेक समुद्र किनारे आपल्या कोकणात आहेत. मग वाट कसली पाहताय, बॅग पॅक करा आणि चला भटकंतीला.
Join Our WhatsApp Community