कोरोनाने लावली लोककलावंतांची वाट

170

कोरोना… गेल्या काही महिन्यांपासून या कोरोनाने संपूर्ण जगावर ताबा मिळवला कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच कोरोनाने कुणाच्या घरातील आधार हिरावला तर कुणाचा रोजगार. कोरोनाचे हे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होऊ लागले आहे. महाराष्ट्रात तर दिवसेंदिवस वाढणारे कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता परिस्थिती कधी स्थिरावेल असा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांनाच पडला आहे. मात्र कोरोनाचा सर्वाधिक फटका बसतोय तो ज्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्राची लोककलेची संस्कृती जतन केली अशा लोककलावंतांना. मग लावणी कलाकार असो किंवा तळ कोकणातील दशावतार. या प्रत्येक कलाकारासमोर आता जगायचे तरी कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मंगळसूत्र मोडून घर चालवायची वेळ

महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या खानदानी कलाकारांवर उपास मारीची वेळ आली आहे. आश्वासन देऊन पोट भरत नाही त्यामुळे प्रत्यक्ष मदत करा अशी आर्त हाक बीड जिल्ह्यातील गोंधळी आणि डवरी समाजाने दिली आहे. घरात काही खायला नाही म्हणून मंगळसूत्र मोडून कुटुंब जगवायची वेळ कलाकारावर आली आहे. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश गावातील शाहीर विठ्ठल काटे यांच्या शाहिरीने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ पाडली होती. मात्र कोरोनाच्या संकटात गेल्या ७ महिन्यांपासून कार्यक्रम बंद आहेत. लग्न सोहळे होत असले तरी जागरण गोंधळ करायला कोणीही धजावत नाही. शाहिरीचे कार्यक्रम तर सोडाच साधा गावामध्ये फिरता येत नाही. यामुळे जागरण गोंधळ, नाटक आणि शाहिरीवरती पोट असणाऱ्या या गावातील १० कुटुंबावर मंगळसूत्र मोडून कसाबसा उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे.

oie 14125246p3gPHDPv

ना घुंगरू वाजला ना फड रंगला

कोरानामुळे गावोगावी भरणाऱ्या जत्रा, उरुस, महोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आल्याने सर्वात जास्त नुकसान तमाशाचे झाले आहे. ऐन हंगामात तमाशाच्या मिळालेल्या सुपाऱ्या रद्द झाल्याने फडमालक हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रात तमाशाचे लहान-मोठे दोनशे फड आहेत. त्यातील मोठ्या फडात कलाकार, नर्तक, वादक, गडी-मजूर असा शंभर ते दीडशे लोकांना रोजगार मिळत असतो. त्यावरच त्यांच्या कुटुंबाची गुजराण होत असते. तमाशात कोल्हाटी, गोपाळ, डोंबारी अशा जमातींमधील लोकांची संख्या जास्त आहे. आता तमाशाचे खेळच बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातील अनेकांनी फडमालकांकडून उचल घेतली आहे, पण आता उचल कशी फेडायची? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती झाडीपट्टीची लोकरंगभूमी असलेल्या दंडार व खडी-गंमत सादर करणाऱ्या कलावंतांची आहे. गावोगावी होणारे दंडार, खडी-गंमतीचे प्रयोग थांबलेले आहेत. त्यामुळे हौशी कलावंत आपल्या कलेपासून दूर गेले आहेत.

पेटाऱ्यान दिलो मदतीचो हात

आपली कोकणी संस्कृती जपण्यासाठी आणि लालमातीशी असलेले नाते आणखी घट्ट करण्यासाठी कोकणातली हौशी कलाकार मंडळी आवर्जुन दशावतारी नाटकांमध्ये सहभाग घेतात. गावोगावी जाऊन नाटकांचे प्रयोग करतात. विशेष म्हणजे गावपाड्यात लोकप्रिय ठरलेला हा कलाप्रकार सातासमुद्रापार पोहोचला आहे. मुंबईमध्येही अनेक ठिकाणी दिवाळीनंतर भरणाऱ्या मालवणी महोत्सवांमध्ये विविध दशावतारी कंपन्यांना आमंत्रित केले जाते. मात्र यंदा या दशावतार मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे दशावतारी कलाकारांच्या उपजीविकेचे साधन बंद झाले आहे. गावात जत्रा नाहीत, त्यामुळे नाटकेही नाही. परिणामी या कलाकारांना आर्थिक संकटांना समोरे जावे लागत आहे. परंतु या कलाकारांच्या मदतीसाठी काही तरुणांनी पुढाकार घेत दशावतारी नाटके ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करत त्यातून मिळालेल्या पैशातून दशावतारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली.

घरी नाही राशन सरकारचे फक्त आश्वासन

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची आज भेट घेतली असून, अमित देशमुख यांनी समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे आश्वासन दिले. सध्याच्या कोरोना परिस्थितीत उत्सव, यात्रा पूर्णपणे बंद आहेत त्यामुळे तमाशा लोककलावंताना आपले जीवन जगणे अवघड जात आहे. त्यांना शासनाने एखाद्या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे,राज्य शासनाने पूर्वीचे तमाशा अनुदान चालू करावे अशा  विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने मंत्री अमित देशमुख यांना दिले.

आज कोरोनामुळे लोककलावंतावर उपसामारीची वेळ आली आहे. तमाशाचे फड बंद पडत आहेत. हे लोककलावंत महाराष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवत असतात. एका कलावंताच्या पाठिमागे दहा कलाकार असतात. कोरोनामुळे अनेक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे बाकीच्या दहा कलावंताचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने लोककलावंतांचे पॅकेज जाहीर करावे.

डॉ. गणेश चंदनशिवे, लोककलावंत आणि अभ्यासक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.