Maharashtra Tourism : पंढरपूरची वारी ते पश्चिम घाटातील सौंदर्य; लंडनमध्ये घडणार ‘महाराष्ट्र संस्कृती’चे दर्शन

150

महाराष्ट्र पर्यटनाला चालना देण्यासाठी दिनांक ७ ते ९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग सहभागी होणार आहे. साहसी, कृषी, जबाबदार, समृद्ध संस्कृती, वारसा आणि वन्यजीव पर्यटनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या लंडनमधील भागीदारांशी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग संवाद साधणार आहे अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

( हेही वाचा : 7th Pay Commission : कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढणार? सरकारने दंडाच्या कारवाईबाबत जारी केले नवे नियम )

पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “महाराष्ट्र राज्यातील कृषी, सांस्कृतिक आणि साहसी पर्यटनात प्रचंड क्षमता आहे, वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट – २०२२ च्या माध्यमातून आंतर राष्ट्रीय पर्यटकांपर्यंत राज्यातील ही माहिती पोहचण्यास मदत होईल. पर्यटन विभाग अधिक शाश्वत, लवचिक आणि सर्वसमावेशक पर्यटनाचा अवलंब करून,पर्यटन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.” वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट – २०२२ मुळे याची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहचेल असेही लोढा म्हणाले.

महाराष्ट्रात प्रवास करणे सुरक्षित- पर्यटन सचिव सौरभ विजय

पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. “कोविड नंतर , महाराष्ट्राने पर्यटनाच्या सर्व विभागांसाठी नियमावलीची जारी केली आहे. निवास युनिट्स, ट्रॅव्हल कंपन्या, वाहतूक, टूर गाइड, पर्यटक, मनोरंजन आणि वॉटर पार्क यांचा यामध्ये समावेश आहे. भारत सरकार (GoI) च्या योजनेअंतर्गत, चारशेहून अधिक हॉटेलनी नोंदणी केली आहे जे या कोविड योग्य वर्तणुकीचे पालन करत आहेत. याचाच अर्थ महाराष्ट्रात प्रवास करणे आणि राहणे पूर्णपणे सुरक्षित आहे याची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत ट्रॅव्हल मार्टच्या माध्यमातून देता येईल असेही सचिव सौरभ विजय म्हणाले.

महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचा सहभाग

महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या शिष्टमंडळामध्ये पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पर्यटन सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. बी. एन. पाटील, एमटीडीसीच्या एमडी श्रद्धा जोशी-शर्मा आणि सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांचा या ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभाग आहे.

पर्यटन विभागाचा स्टॉल व तीन दिवस महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृतीची देणार माहिती

राज्य पर्यटन संचालनालयतर्फे येथे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले व राज्यातील प्रवेशाचे ठिकाण गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती असलेला स्टॉल उभारण्यात आला आहे. या तीन दिवसांदरम्यान हे शिष्टमंडळ प्रमुख टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट आणि मीडिया भागीदारांना भेटणार आहे, लंडन येथील पर्यटन, सांस्कृतिक आणि वारसा स्थळे, उत्साहवर्धक साहसी अनुभव, विदेशी पाककृती, वाइन पर्यटन, कृषी पर्यटन यांसारख्या अनुभवांची चर्चा आणि विचार जाणून घेणार आहेत.

महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृतीची दर्शन घडवणारी पंढरपूरची वारी, महाराष्ट्रातील विवाह समारंभ याचेही सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. राज्याने नव्याने तयार केलेल्या डायमंड सर्किट- मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या जिल्ह्यांची वैशिष्ट्य माहितीपत्रक तसेच व्हिडीओ स्वरूपात येथे दाखवण्यात येतील. राज्याची समृद्धता विविधता आणि वारसा याविषयी माहितीसाठी रोड शो देखील आयोजित करण्यात येणार आहे.

अजिंठा, एलोरा, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईतील आर्ट डेको इमारतींचे समूह आणि पश्चिम घाटाचा भाग यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात. त्यामुळे, युनेस्कोने वारसा स्थळांचे नव्याने तयार केलेले 360 अंश व्हिडिओ देखील येथे दाखवण्यात येतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.