विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा विठुमाऊलीच्या गजराने महाराष्ट्र दुमदुमतोय. या भक्तिभावाने सजलेल्या सोहळ्यात महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय देखील सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. यंदा पर्यटन दिंडीच्या रुपात पर्यटन संचालनालय वारीत सामील होणार आहे. 1 जुलै रोजी फलटण वरून सुरू होणारी पर्यटन दिंडी समस्त वारकऱ्यांसह हरिनामाचा जयघोष करत आषाढी एकादशीला 10 जुलै रोजी पंढरपूर गाठेल. या दिंडीत साधारण 300 ते 400 विठूभक्त व पर्यटनप्रेमी जोडले जाणार आहेत.
( हेही वाचा : पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रथमच Carvan व्हॅनचा वापर!)
महाराष्ट्र म्हणजे पंढरीला जाणाऱ्या लोकांचा देश
असं म्हणतात, ‘महाराष्ट्र म्हणजे पंढरीला जाणाऱ्या लोकांचा देश,’ वारी हे महाराष्ट्राला जोडणारे व्यापक ‘नेटवर्क’ आहे. गावोगावची संस्कृती, भाषा, लोककला यांचा संगम या वारीत पाहायला मिळतो. वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. कडूस फाटा (माळशिरस),वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने “माऊलीचा अश्व” म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकऱ्यांची धारणा आहे.
‘महाराष्ट्र पर्यटन दिंडी २०२२’
वारीचा इतिहास अनेक वर्षांचा आहे. साक्षात छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा वारीला संरक्षण दिल्याचे दाखले दिले जातात. यंदाच्या या सोहळ्यात पर्यटन दिंडी रुपात सहभागी होण्यासाठी पर्यटन संचालनालय उत्सुक असल्याचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.
कृषी पर्यटन विकास महामंडळाचे संस्थापक पांडुरंग तावरे म्हणाले की महाराष्ट्र पर्यटन विभागाने ‘महाराष्ट्र पर्यटन दिंडी २०२२’ आयोजित करून मोठे मोलाचे काम केले आहे. आषाढी वारीमध्ये सर्व शेतकरी, वारकरी बांधव सामील होतात ज्यांना ह्या दिंडीच्या माध्यमातून कृषी पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण इत्यादी धोरणांबद्दल माहिती दिली जाणार आहे. या दिंडीत पर्यटनस्थळांची माहिती सांगणारी डिजिटल व्हॅन व पर्यटन कॅराव्हॅन सुद्धा असणार आहे.
Join Our WhatsApp Community