कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर यंदा ठाण्यात निर्बंधमुक्त आंबा महोत्सव साजरा होणार आहे. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव यंदा १ मे ते १२ मे या कालावधीत नौपाड्यातील भगवती मैदानात होणार असून कोकणातील अस्सल हापुस आंब्याची चव खवय्यांना चाखता येणार आहे.
( हेही वाचा : सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन पुरस्कारासाठी असा करा ऑनलाइन अर्ज )
ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाचे १५ वे वर्ष आहे. या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची थेट भेट होते. यात शेतक-यांना फायदा होतोच शिवाय ठाण्यातील ग्राहकांना कोकणातील अस्सल हापूस आंबा योग्य दरात मिळतो.
यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. २०१९ ला ३ लाख २० हजार मेट्रिक टन, २०२० ला २ लाख ५६ हजार मेट्रिक टन , २०२१ ला १ लाख २८ हजार मेट्रीक टन आंबा उत्पादन झाले आहे.
प्रत्यक्ष विक्रीसह ऑनलाईन विक्रीही
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेली दोन वर्षे आंबा महोत्सव आयोजित करता न आल्याने ऑनलाईन विक्रीद्वारे ”आंबा आपल्या दारी” हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. यावर्षी भगवती मैदानात आंबा महोत्सवात प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध ठेवल्याचे आमदार संजय केळकर यानी सांगितले. यासाठी मुंबई – ठाण्यातील खवय्यांनी राजेंद्र तावडे ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आमदार केळकर यांनी केले आहे.
दापोलीत कृषी विद्यापीठाचे प्रदर्शन
दापोली कृषी विद्यापीठाच्यावतीने आंबा महोत्सव स्थळी आंब्याच्या विविध प्रजातीचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आंबा व त्याच्या प्रजातींविषयी दुर्मिळ माहिती नागरिकांना मिळणार आहे.