अमेरिकेच्या रस्त्यांवर चक्क मराठी संस्कृतीचा बोलबाला!

191

अमेरिकेतील कॅलिफोर्निया या जिल्ह्यातील प्लेझंटन शहरात राहणाऱ्या मराठमोळ्या तरुणांनी महाराष्ट्र संस्कृती लोकांसमोर मांडत प्लेझंटन शहरातली संध्याकाळ गाजवली. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपण्याचा प्रयत्न या शहरात वास्तव्यास असणारी ही मंडळी विविध उपक्रमातून करत असतात.

पहिल्यांदाच मिळाली परवानगी

मकर संक्रांत, गौरी गणपती, दिवाळी अशा सणांच्या दिवसात इथे काही कार्यक्रम होत असतात, परंतु हे कार्यक्रम तसे मराठी अथवा भारतीय असलेल्या लोकांमध्येच साजरे होत असतात. परंतु ही संध्यकाळ मात्र अपवाद ठरली. इथल्या प्रथेप्रमाणे दरवर्षी प्लेझंटनमध्ये हॉलिडे परेड डिसेंबर महिन्यातल्या पहिल्या शनिवारी आयोजित केली जाते. त्यामध्ये प्लेझंटन मधील शाळांमधील बॅण्ड पथके मेन स्ट्रीट वरून आपली वाद्ये वाजवीत जात असतात. या परेडमध्ये पहिल्यांदाच काही उत्साही तरुण मंडळींनी ढोलताशा व लेझीम पथकांना सहभागी करून घेण्याची परवानगी मिळवली.

(हेही वाचा एमआयएमचा मोर्चा चिघळण्याची शक्यता, आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती?)

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे घडले दर्शन

संध्याकाळी बरोबर ५ वाजता आपल्या पारंपरिक पोशाखात ढोल ताशा पथक व नऊवारी साड्या नेसून, या परेडची सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भरपूर गर्दी केली होती. या शहरात थंडी सुरु झाली आहे, त्यामुळे ५ वाजता अंधार पडतो. अशा वातावरणात हळूहळू, थोडंसं चाचपडत आणि सावध अशी सुरुवात ह्या मंडळींनी केली. आपण केलेली वेशभूषा आणि नाचण्याची पद्धत इथल्या लोकांना आवडेल कि नाही, या संभ्रमात हळूहळू हे पथक पुढे सरकू लागले. हळूहळू करत ढोल, ताशाचा नाद आणि त्यावर थिरकणारी लेझमची पावले ह्यांनी तिथल्या जनमाणसांचा पूर्णपणे ताबा घेतला. लोकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि उत्तेजन ह्यामुळे या पथकांचा आत्मविश्वास दुणावू लागला आणि तिथले वातावरण पूर्णपणे बदलून गेले. अतिशय उत्साहाने ढोल-ताशाचा आवाज दुमदुमू लागला आणि त्याच तालावर लेझीमची पावलेही तेवढ्याच उत्साहाने थिरकू लागली. दोन्ही बाजुंनी लोकांनी या तालावर टाळ्यांचा व शिट्यांचा ठेका धरला, तर काही जण नाचूही लागले. इथल्या लोकांना काही तरी वेगळं भारावून टाकणारं, पाहिल्याच, ऐकल्याचं समाधान मिळालं व आपल्या मराठी मंडळींना आपली परंपरा जपण्याचं, सादर करण्याचं व त्याचं कौतुक पाहण्याचंदेखील समाधान मिळालं, अशी ही अद्भुत व रोमांचकारी २ तासांची संध्याकाळ प्लेझंटनवासीयांनी अनुभवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.