स्थलांतरित पक्ष्यांना मिळतंय सहज अन्न!

106

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मनसोक्त कोसळलेल्या पावसामुळे मुंबई व नजीकच्या किनारपट्टी भागांत आगमन झालेल्या स्थलांतरित पक्ष्यांना आता सहज अन्न उपलब्ध झाले आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचं दर्शन सहज होत असल्याने पक्षीनिरीक्षक सुखावलेत.

महिन्याची सुरुवातच पावसाच्या धुमाकुळीनं झाली, त्याअगोदरही पावसाचा हलका मारा मुंबई व नजीकच्या परिसरात सुरुच होता. त्यामुळे जागोजागी डबकी तयार झाली आहेत, पावसामुळे गवताळभागांत दिसणारे किटकंही मोठ्या संख्येनं उपलब्ध असल्याने पक्षी जंगलाच्या आतजाण्याऐवजी परिघातच सहज दिसताहेत. त्यांना पाण्याचा स्त्रोतही डबक्यांतून मिळत असल्यानं स्थलांतरित पक्ष्यांचे थवे सहज पक्षीप्रेमींना खुणावू लागलेत.

स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन 

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाण्यातील येऊर परिसर, रायगडमधील कर्नाळा पक्षी अभयारण्यात स्थलांतरित पक्षी सहज पक्षीप्रेमींच्या छायाचित्रात कैद होत आहेत. अजून काही दिवस साचलेली डबकी राहतील, त्यामुळे स्थलांतरित पक्षी आतमध्ये जंगलात जाणार नाहीत, पक्षीदर्शन सहज होतेय, अशी माहिती पक्षीअभ्यासक अविनाश भगत यांनी दिली. गवतावर जगणा-या नाकतोड्या आणि चतुर आदी कीटक हे पक्ष्यांचं आवडतं खाद्य आहे. पक्ष्यांचा समूह दिसल्याने पक्षीप्रेमींच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

( हेही वाचा : समुद्र किनारा स्वच्छतेसाठी मनसेचा पुढाकार, अमित ठाकरेंनी केले आवाहन! )

  • गवताळ आणि पर्वतरांगांवर स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन

अमुर ससाणा, पर्वतीय पाकोळी, पांढुरका भोवत्या, युरेशियन चिमणिमार ससाणा, धुतर ससाणा, छोट्या कानाचे घुबड, ब्लिथचा बोरू वटवट्या, धान वटवट्या, काळ्या डोक्याचा भारिट, गोरली, गुलाबी मैना

  • जंगलात आढळून येणा-या स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन

स्वर्गीय नर्तक, लाल छातीची माशीमार, हिरवट वटवट्या, निळी माशीमार, करडा धोबी, नारंगी डोक्याचा कस्तुर, निलंग माशीमार, शेंडीवाला कोतवाल

  • पाणथळ जमिनीवर आढळणा-या स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन

बहिरी ससाणा, मोठा ठिपक्यांचा गरुड, तपकिरी डोक्याचा कुरव, कल्लेदार सूरय, युरेशियन कोरल, ठिपकेवाली तुतारी, छोटा टिलवा, उचाट्या, सोन चिखल्या, छोटा चिखल्या, मोठा रोहिल, चक्रवाक, थापाट्या बदक, भुवई बदक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.