सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सिंधुदुर्गात पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी “मान्सून धमाका फेस्टिव्हलचे” आयोजन करण्यात येणार आहेत. या फेस्टिव्हलपूर्वी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन द्याव्यात, असे आदेश शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिले.
( हेही वाचा : नाना पटोलेंनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मविआचे सरकार पडले – आशिष देशमुख)
केंद्र सरकारच्या स्वदेश पर्यटन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या पावसाळ्याच्या काळात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मान्सून धमाका फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. मान्सून धमाका फेस्टिव्हलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्याकडे आकर्षित होतील. अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली आहे.
जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आंबोली, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर, वेंगुर्ला, विजयदुर्ग अशा पर्यटन समृध्द असलेल्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटन आराखडा तयार करावा. तिलारी प्रकल्पाच्या ठिकाणी विस्तीर्ण प्रमाणात बॅक वॉटर आहे. या बॅक वॉटर परिसराची पर्यटन विभागाने पाहणी करुन या ठिकाणी केरळच्या धर्तीवर हाऊस बोट, रॉक कॉटेज, टेंट ॲडव्हेन्चर स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स, तसेच हॉटेल्स विकसित करता येतील का? याबाबत आराखडा तयार करावा. यासाठी शासन स्तरावरुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही मंत्री केसरकर म्हणाले.
सिंधुदुर्गात एमटीडीसीच्या माध्यमातून सहलीचे आयोजन करणाऱ्या संस्थाचीही यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच रोड शो चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटक या जिल्ह्याकडे आकर्षित होतील. हा पर्यटन महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडाव्यात, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community