दहिसर आणि मुलुंडमध्ये सध्या सरपटणारे प्राणी सर्रास दिसत आहेत. मुलुंडमध्ये कोब्राच्या पाठी दोन मांजर लागल्याचे पाहायला मिळाले. यासह शनिवारी संध्याकाळी घोणस या सापाची जोडी दहिसरमध्ये फुलपाखराच्यामागे बागडताना दिसली. मुलुंडच्या घाटी पाडा या रहिवाशी भागांत कोब्रा या विषारी नागाला चक्क दोन मांजरांचा सामना करावा लागला. दोन्ही मांजरींनी कोब्राला घेरले, पाठीमागे भिंत असल्याने कोब्राला पळण्यासाठी मार्गच उरला नाही. कोब्राने आपला फणा काढला तरीही दोन्ही मांजरींनी त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. अखेर ‘रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर’ (रॉ) या प्राणीप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी या मांजरींच्या तावडीतून कोब्राची सुटका केली. कोब्राच्या शरीरावर कुठेही जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे कोब्राला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
पाळीव प्राण्यांची संख्या अनियंत्रित
वाढत्या पाळीव प्राण्यांच्या संख्येमुळे ही समस्या दिसून आली आहे. पाळीव प्राणी आता वन्यजीवांसाठीही समस्या होत आहेत. सहज उपलब्ध होणा-या अन्नामुळे पाळीव प्राण्यांची संख्या अनियंत्रित होत असल्याची माहिती ‘रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर’ (रॉ) चे संस्थापक पवन शर्मा यांनी दिली. पाळीव प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवायला हवी, असेही शर्मा म्हणाले.
दहिसरकरांना दर्शन
सध्या घोणसचा मिलनाचा काळ आहे. त्यामुळे काही दिवस घोणस दहिसरकरांना सारखे दर्शन देतील, असे प्राणीप्रेमींनी सांगितले. तर दहिसर पूर्वेला शनिवारी सायंकाळी घोणस या विषारी सापांची जोडी फुलपाखराच्या मागे स्थानिकांना सहज दिसू लागली. हा व्हिडिओ स्थानिक पातळीवर चांगलाच व्हायरल होत आहे.
Join Our WhatsApp Community