कोविड -१९च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. उपचारांदरम्यान होणाऱ्या रक्ताच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईत मुंबई काँग्रेसतर्फे, १२ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील यांच्या पुढाकाराने बुधवार, १४ एप्रिल २०२१ रोजी उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे मुंबईतील बोरीवली पश्चिम येथील मेघा पार्टी हॉल, शिंपोली येथे सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१० हजार बॉटल्स रक्त संकलित करण्याचा उपक्रम
याबद्दल अधिक माहिती देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, आज कोरोनामुळे संपूर्ण राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून मुंबई काँग्रेसतर्फे १२ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रांमध्ये भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईतून १० हजार बॉटल्स रक्त संकलित करण्याचा निर्णय मुंबई काँग्रेसने घेतला आहे.
(हेही वाचाः आता सोमय्या मैदानावर नवीन जंबो कोविड सेंटर!)
नागरिकांना आवाहन
बुधवार, १४ एप्रिल २०२१ रोजी, सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे बोरीवली पश्चिम येथे ‘भव्य रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. १२ एप्रिल रोजी मालाड येथील मालवणी आणि गोवंडी विभागामध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. उद्या बोरीवली पश्चिम येथे तशाच प्रकारचे ‘भव्य रक्तदान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी भाई जगताप यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
उत्तर मुंबईतील बोरीवली येथील रक्तदान शिबिरात मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष कालू बुधेलिया, मुंबई काँग्रेस सचिव मनोज नायर, उत्तर मुंबई महिला अध्यक्ष प्रगती राणे, बोरिवली युवक काँग्रेस अध्यक्ष वरूण पाटील सहभागी होणार आहेत.
Join Our WhatsApp Community