हुरडा खायचाय? भेट द्या, महाराष्ट्रातील ‘या’ पर्यटन केंद्राला!

133

नोव्हेंबर-डिसेंबर आला की, हुरडा पार्टीचे वेध लागतात. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हुरडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. अशाच, संपूर्ण राज्यातील पर्यटकांना आकर्षित करणा-या नगर दौंड रोडवरील नगरपासून फक्त १० किलोमीटर अंतरावर असलेल्या केशरबाग मेहेर कृषी पर्यटन केंद्रात बहुप्रतिक्षित हुरडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. चांगल्या पावसामुळे ज्वारीचे पीक चांगलेच बहरलेले असून कोवळ्या कणसांचा रूचकर हुरडा याठिकाणी उपलब्ध झाला आहे.

हुरडा महोत्सव

नगर-दौंड महामार्गावरील केशरबागमध्ये जाणीवपूर्वक फुलविण्यात आलेले कृषी पर्यटन केंद्र प्रत्येकाच्या पसंतीस उतरलेले आहे. या प्रसन्न चित्त वातावरणात दरवर्षी हुरडा महोत्सवाला मोठी गर्दी होत असते. याठिकाणी प्रत्येक जण अतिशय मोकळ्या वातावरणात हुरड्याचा आनंद लुटतो. नर्सरीतील विद्यार्थी, शाळा, महाविद्यालयाच्या सहलीही केशरबागमध्ये आवर्जून येतात.

( हेही वाचा : तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार आंगणेवाडीच्या भराडी देवीचा यात्रोत्सव )

घरगुती जेवण

या ठिकाणी सकाळच्या नाश्त्यापासून भोजनापर्यंत सर्व काही पूर्णत: घरगुती स्वादाचे असते. चुलीवर तयार केलेले गरमागरम थालीपीठ तसेच यावर्षीपासून नगरमध्ये प्रथमच सांबार पोहे येथील मेन्यूत समाविष्ट झाले आहेत. याशिवाय ऊसाचा ताजा रस, हुरड्याबरोबर विविध प्रकारच्या चटण्या, रेवडी, गोडीशेव, हरभरा, गरमागरम चुलीवरील भाकरी असलेले अस्सल मराठमोळ्या चवीचे जेवण याठिकाणी उपलब्ध आहे.

लहान मुलांसाठी तर केशरबाग मौजमजेचे हक्काचे केंद्र ठरले आहे. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तपणे खेळता यावे यासाठी विविध प्रकारची खेळणी याठिकाणी आहेत. झोपाळे, घसरगुंडी, झुलता पूल, राउंडर या खेळण्यांसह बैलगाडी सफारीचीही व्यवस्था आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.