International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिवस असा होणार साजरा

“मानवतेसाठी योग” या संकल्पनेवर आधारित 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस (IDY) 21 जून, 2022 रोजी साजरा केला जाईल. ही संकल्पना आयुष मंत्रालयाने भारतात आणि जगभरात आयोजित केलेल्या सर्व योग प्रात्यक्षिक शिबिरे आणि सत्रांसाठी निवडली आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होणार पहिली इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस!)

देश “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” देखील साजरा करत असल्याने, भारतातील विशेष महत्त्वाच्या 75 स्थानांवर योग प्रदर्शन आणि प्रात्यक्षिके आयोजित केली जातील, ज्यात केंद्रीय मंत्री, नेते आणि सेलिब्रिटी उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सहभागी होत असलेल्या म्हैसुरू येथील मुख्य आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाशी ही 75 ठिकाणे जोडली जातील. महाराष्ट्रात, केंद्रीय मंत्री नागपूर, नाशिक आणि पुणे अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी योग प्रात्यक्षिक सत्रात भाग घेतील. नागपूरच्या झिरो माइलस्टोन येथील योग दिन शिबिरात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा सहभाग असेल.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे पुण्यातील फुगेवाडी मेट्रो स्टेशनजवळ आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोषण संस्थेतर्फे आयोजित योग शिबिरात सहभागी होणार आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाद्वारे जिल्हा प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आलेल्या नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर मंदिरात गृहराज्यमंत्री नित्यानंद राय योग सत्राचे नेतृत्व करतील.

प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन

इतर महत्त्वाच्या प्रतिष्ठित स्थळांमध्ये दिल्लीतील लाल किल्ला, बोधगया येथील महाबोधी मंदिर, कोणार्क येथील सूर्य मंदिर, कर्नाटकातील हम्पी यासारख्या युनेस्कोच्या अनेक जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे. ग्वाल्हेर किल्ला, दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेचे बटासिया लूप, सारनाथ आणि वाराणसी घाट, दिल्लीतील जंतरमंतर आणि लोटस मंदिर, पोर्ट ब्लेअरमधील सेल्युलर जेल, हिमाचल प्रदेश मधील कांगडा किल्ला, अयोध्येतील राम मंदिर परिसर, जैसलमेर सॅण्ड ड्यून, प्यांगॉन्ग तलाव, केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी अशी काही इतर प्रतिष्ठित ठिकाणे आहेत जिथे 21 जून रोजी सकाळी योग प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन केले जाईल.

केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक गोवा या शेजारील राज्यातील, जुन्या गोव्यातील से कॅथेड्रल येथे होणाऱ्या योगसत्रात सहभागी होतील तर राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल,हे आग्वादा किल्ला येथील योग प्रात्यक्षिक सत्रात सामील होतील.

या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) साजरा करण्यासाठी, केंद्रीय मंत्रालयांसह विविध संस्थांनी एप्रिलपासूनच ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. पुणे येथील सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनच्या (CBC), प्रादेशिक कार्यालयाने, (महाराष्ट्र आणि गोवा या महिन्यात अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, यवतमाळ, नागपूर, नांदेड, सोलापूर, वर्धा, नाशिक, कोल्हापूर,जळगाव, परभणी, अलिबाग, पुणे आणि पणजी यासह अनेक ठिकाणी योग प्रचार कार्यक्रम आयोजित केले आहेत.या कार्यक्रमांत सामायिक योग पध्दतीवर तज्ञांची व्याख्याने, जनजागृती मेळावे आणि स्पर्धा, विविध योग आसनांची प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम यासह योगावरील छायाचित्र प्रदर्शने यांचा समावेश आहे. या निमित्ताने पणजी क्षेत्रीय कार्यालयात दिव्यांग मुलांसाठी दोन दिवसीय विशेष योग सत्र सुरू होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here