नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘या’ देवीची केली जाते पूजा, जाणून घ्या अख्यायिका

135

घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. नऊ दिवस चालणा-या उत्सवात देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गादेवीच्या शैलपुत्री या रुपाची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीचा इतिहास आणि तिची आख्यायिका काय आहे ते जाणून घेऊया.

दुर्गेचे पहिले रुप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला मूलाधार चक्रात स्थिर करतात. या दिवसांपासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते.

( हेही वाचा: बाळासाहेबांनंतर दसरा मेळाव्यातील ‘या’ पाच घटना ज्याने शिवसेनेत निर्माण झाली अस्वस्थता )

अशी आहे आख्यायिका

या दूर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव सती असे होते. तिचा विवाद शंकराशी झाला होता.

एकदा राजा प्रजापती यांनी मोठा यज्ञ केला होता. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु त्याने शंकराला निमंत्रण दिले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला आपल्याला बोलावले नसल्याचे सांगितले. परंतु वडिलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपल्या आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.

सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. तिथे तिला शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे दिसून आले. दक्ष राजाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले. हे सर्व पाहून ती संतप्त झाली. आपण ईथे येऊन मोठी चूक केल्याचे तिच्या लक्षात आले. आपल्या नव-याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रुपात जन्म घेतला. यावेळी ती शैलपुत्री या नावे प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती ही देखील तिचीच नावे आहेत. शैलपुत्री देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.