-
ऋजुता लुकतुके
बांधकाम क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या एनसीसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये या आठवड्यात तेजी दिसून आली. बुधवारी (२६ मार्च) कंपनीने बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीकडून दोन कंत्राटं मिळाल्याची घोषणा केली. दोन्ही कंत्राटांचा मिळून आकार हा कंपनीच्या भाग भांडवलाइतका जवळ जवळ असल्याचंही कंपनीने जाहीर केलं. तिथपासून शेअरही उसळायला सुरुवात झाली. एकट्या बुधवारी शेअरने ६ टक्क्यांची उसळी घेतली होती. (NCC Share Price)
दोन्ही कंत्राटांची एकूण किंमत ही १०,८४० कोटी रुपयांच्या घरात आहे. बीएसएनच्या भारतनेट या प्रकल्पासाठी काही ठिकाणी नेटवर्क उभारताना त्याचं डिझाईन, पुरवठा, उभारणी, स्थापना, इन्स्टॉलेशन, अपग्रेडेशन आणि देखभाल या सगळ्याची जबाबदारी एनसीसीवर असेल. एकूणच या महिन्यात कंपनीचा शेअर १९.५८ टक्क्यांना वाढला आहे. आता शुक्रवारी तो बंद होताना ०.३५ टक्क्यांच्या वाढीसह २०९.२७ अंशांवर पोहोचला आहे. (NCC Share Price)
(हेही वाचा – Gail Share Price : गेलचा शेअर महिनाभरात १६ टक्क्यांनी वाढला)
बीएसएनच्या दोन स्वतंत्र कंत्राटांपैकी पहिलं हे उत्तराखंड राज्यातील आहे. तर दुसरं कंत्राट हे मध्य प्रदेश, दादरा नगर हवेली आणि दिऊ दमण या भागांसाठीचं आहे. या दोन्ही कंत्राटांमध्ये ३ वर्षांचा उभारणीचा काळ असेल. त्यानंतर त्यांची देखभाल १० वर्षांसाठी करायची आहे. विशेष म्हणजे कंपनीचं बाजारातील भाग भांडवल हे १२,८३६ कोटी रुपयांचं आहे. कंपनीला नुकती मिळालेली ही कंत्राटंही १२,००० कोटींच्या आसपास आहेत. म्हणजेच भांगभांडवला इतकी मोठी कंत्राटं कंपनीला मिळणार आहेत. (NCC Share Price)
एरवी २०२५ ला आर्थिक वर्ष संपवताना कंपनीने सादर केलेला तिमाही ताळेबंद फारसा उत्साहवर्धक नाही. कंपनीला गेल्यावर्षीच्या तुलनेत १२.५ टक्के तोटा सहन करावा लागला आहे. पण, कामकाजातून मिळणारा महसूल मात्र दीड टक्क्यांनी वाढून ५,३४४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सध्या हा शेअर आपल्या सर्वकालीन सर्वोच्च किमतीपासून ४१ टक्के खाली असला तरी मागच्या महिनाभरात शेअरमध्ये वाढ झाली आहे. (NCC Share Price)
(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीवर सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community