बुधवारी पडलेल्या दिवसभराच्या पावसाने ऐन डिसेंबर महिन्यातील थंडीच्या मोसमातील नव-नवे रेकॉर्ड तयार केलेत. मुंबईत दिवसभरात ९१ मिमी पाऊस झाल्याने महिन्याभराच्या प्रतीक्षेतील थंडीचं मुंबईत अलगद आगमन झालं. कधी नव्हे ते डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच एवढा पाऊस झाल्याचा नवाच रॅकोर्ड झाल्याचं हवामान खात्याच्या नोंदीत दिसून येतंय. कमाल आणि किमान तापमानात प्रचंड घट झाल्याने मुंबईकरांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होतेय. मुंबईच्या सकाळच्या वातावरणात दमेकरी रुग्णांना श्वसनाचा त्रास झाल्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त होतेय.
(हेही वाचा – अवकाळी पावसाचा पश्चिम महाराष्ट्रात कहर! रब्बी पिकांसह फळबागा उध्वस्त)
हवामान खातं म्हणतंय…
मुंबईतल्या सांताक्रूझ केंद्रात किमान तापमान १८.५ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात १८.५ अंश सेल्सिअवरवर नोंदवलं गेलं. कुलाब्यात ९०.२ मिमी पावासाची नोंद झाली. नजीकच्या डहाणूत पावसानं नवा रॅकोर्ड केला. डहाणूत ११४.४ मिमी पावसाची नोंद झालीय तर किमान पारा १८.६ अंश सेल्सिअसवर खाली घसरलाय. ठाणे-बेलापूर परिसरात ९० मिमी पाऊस तर २१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीय. नाशिक, पुणे, सोलापूर या ठिकाणीही मध्यरात्रीपर्यंत पावसाची हजेरी सुरुच होती. मात्र कोकणाच्या तुलनेत मध्य महाराष्ट्रात फारसा पाऊस झाला नाही. तर मराठवाडा आणि विदर्भ कोरडेच राहिल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दरम्यान, आज मुंबईसह कोकण परिसरात पावसाचा जोर कमी राहील. मुंबईत काही ठिकाणी हलका पाऊस राहील. शुक्रवारी पावसाची शक्यता नसल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं दिलाय.
पावसाचे बुधवारचे रेकॉर्ड
अवकाळी पावसाच्या मा-याने बुधवारी मुंबईतील कमाल तापमान ९ अंशाने खाली उतरत २४.८ अंश सेल्सिअसवर नोंदवलं गेलं. गेल्या सहा वर्षांतील डिसेबर महिन्यातील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद बुधवारी झाली. त्याखालोखाल अलिबागमध्येही गेल्या चार वर्षांतील डिसेंबर महिन्यातील सर्वात कमी कमाल तापमान, २३.५ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.
आरोग्य सांभाळा
अचानक थंडी सुरु झाल्याने शरीरातील तापमान वातावरणाशी मिळतंजुळतं घेताना वेळ घेतं. त्यामुळे येत्या दिवसांत सर्दी, खोकल्याचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. शरीरातील तापमान नियंत्रित राहण्यासाठी कोमट पाण्याचं सेवन करा. शाल, स्वेटरही जवळ बाळगा. त्रास जास्त जाणवल्यास फॅमिली डॉक्टरच्या दवाखान्यात भेट द्या.
Join Our WhatsApp Community