पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तूंच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामांन्यांचा खिसा चांगलाच रिकामा होत आहे. पण आता यासोबतच महामार्गांवरील प्रवास देखील महागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा(NHAI)कडून राष्ट्रीय महामार्गांच्या टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोल नाक्यांची संख्या मर्यादित करण्यात येण्याची घोषणा केली असली, तरी या वाढत्या दरांमुळे त्यांचा भार इतर टोल नाक्यांवर पडणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
इतके वाढणार दर
गुरुवार 31 मार्च मध्यरात्री 12 पासून टोलचे दर वाढणार आहेत. 10 ते 65 रुपयांपर्यंत ही वाढ करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे. छोट्या वाहनांसाठी साधारणपणे 10 ते 15 तर व्यावसायिक वाहनांसाठी तब्बल 65 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. देशभरातील सर्वच मार्गांवरच्या टोलनाक्यांवर ही दरवाढ केली जाणार आहे.
(हेही वाचाः आयटीआर भरण्याचा शेवटचा दिवस; नाहीतर होऊ शकतो तुरुंगवासही)
महाराष्ट्रात किती होणार वाढ?
या दरवाढीमुळे 1 एप्रिल 2022 पासून सर्वसामांन्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रातल्या टोलच्या दरांत किती वाढ होणार आहे याबाबतची माहिती अजून मिळालेली नसली, तरी राजधानी दिल्लीपासून इतर सर्वच राज्यांमध्ये ही दरवाढ करण्यात आली आहे.
टोल नाक्यांची संख्या कमी होणार
केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गांवरील टोलनाक्यांची संख्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी लोकसभेत दिली होती. टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि सातत्याने महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांनाही दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आखण्यात आली आहे. ६० किमीच्या अंतरामध्ये केवळ एकच टोल प्लाझा सुरू राहील. सरकारची ही योजना पुढच्या ३ महिन्यांमध्ये लागू होणार आहे. अशी घोषणा गडकरी यांनी केली होती.
(हेही वाचाः कोळशाच्या टंचाईमुळे आता नागरिकांना बसणार शाॅक!)
Join Our WhatsApp Community