-
ऋजुता लुकतुके
नोव्हेंबर २०२४ साली निवा बुपा हेल्थ इन्श्युरन्स कंपनीचा शेअर भारतीय बाजारांमध्ये सूचीबद्ध झाला. १३,५२० कोटींचा हा आयपीओ होता. यात ८०० कोटी रुपयांचे नवीन शेअर तर बाकीचे ऑफर ऑन सेल शेअर होते. शेअर सूचीबद्ध झाल्या झाल्या केंद्र सरकारने आरोग्य विम्याच्या हफ्त्यावरील जीएसटी कर कमी केल्याची बातमी आली. आधी हा जीएसटी १८ टक्के होता. तो कमी होऊन थेट ५ टक्क्यांवर आला. या बातमीचा इतका सकारात्मक परिणाम पहिल्याच महिन्यात शेअरवर झाला की, १.५२ पट जास्त सबस्क्राईब झालेल्या आयपीओनंतर लिस्टिंगही चांगलं झालं. डिसेंबर महिन्यातच शेअरला २० टक्के अपर सर्किट लागलं. (Niva Bupa Share Price)
(हेही वाचा – BMC : मढ आयलॅण्ड रुपवीर बंगल्यावर महापालिकेने चालवला बुलडोझर)
सूचीबद्ध झाल्यानंतर शेअर लगेचच ३० टक्क्यांनी वर गेला आणि डिसेंबर २०२४ मध्ये या शेअरने १०७ हा आतापर्यंतचा उच्चांक प्रस्थापित केला. आरोग्य विमा क्षेत्रातही थेट परकीय गुंतवणुकीला केंद्राने आता परवानगी दिली आहे. ७४ टक्के गुंतवणूक ही परदेशातून येऊ शकते. निवा बुपाने अजून या मर्यादेपैकी ६७ टक्के इतकीच गुंतवणूक सध्या परदेशातून आणली आहे. बाकीची गुंतवणूक ही देशांतर्गत कंपन्या आणि गुंतवणूकदारांची आहे. हा एकप्रकारे कंपनीवर देशी गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास आहे आणि त्याच जोरावर हा शेअर कामगिरी करत आहे. जानेवारी २०२५ पासून एकूणच जागतिक वातावरण हे अस्थिर आहे. त्याचा खूप मोठा फटका वित्तीय क्षेत्राला बसला आहे. खासकरून परकीय गुंतवणूक कमी झाली आहे. विमा क्षेत्र हे वित्तीय क्षेत्रच असल्यामुळे निवा बुपा कंपनीचा शेअरही तडाख्यात सापडला. या आठवड्यापर्यंत तो आपल्या उच्चांकापेक्षा २७ टक्के खाली ७४.३० अंशांवर आला आहे. या आठवड्यात बाजार बंद होताना शेअरमध्ये २ टक्क्यांची घसरण झाली. (Niva Bupa Share Price)
(हेही वाचा – HAL Share Price : संरक्षण क्षेत्रातील कंपनीचा हा शेअर देतोय भरघोस परतावा)
निवा बुपा शेअर सूचीबद्ध होऊन फक्त चारच महिने झाले असल्यामुळे अजून संशोधन संस्थांनी त्याचा अभ्यास सुरू केलेला नाही. पण, कंपनीचं भाग भांडवल १३,५७० कोटी रुपये इतकं आहे आणि पीई गुणोत्तरही ८२ रुपये इतकं तगडं आहे. सध्या शेअर ६९.२१ या वार्षिक नीच्चांकाहून वर जाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. म्हणजेच पुन्हा उभारी घेण्याचा त्याचा प्रयत्न असेल. इतक्यातच निवा बुपाला मार्क्समेन टेली या कंपनीने आयोजित केलेल्या ब्रँड पुरस्कारात भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँडचा पुरस्कार पटकावला आहे. शिवाय ही अशी कंपनी आहे जी फक्त आरोग्य विमा सेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अलीकडेच कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने निवा बुपाचा अभ्यास सुरू केला असून कंपनीला पहिलं रेटिंग दिलं आहे. त्यांनी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे आणि त्यासाठी १३ टक्के वाढीचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. (Niva Bupa Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी आपल्या जबाबदारीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट वाचकांना शेअरमध्ये खरेदी – विक्रीचा सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community