जीपीएस इमेजिंगचा वापर देशभरातील टोल वसुलीसाठी लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान तीन महिन्यांत अंतिम केले जाईल. यामुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी टाळण्यात मदत होणार आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले.
गडकरी यांची माहिती
जीपीएस आधारित टोलिंग प्रणालीसाठी लागणारे तंत्रज्ञान देशात उपलब्ध नाही. म्हणूनच सरकारकडून हे तंत्रज्ञान असलेल्या कोरियन आणि रशियन कंपन्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्व टोल नाके येत्या वर्षभरात बंद करुन जीपीएस इमेजिंगच्या आधारे टोल वसुली केली जाईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी लोकसभेत सांगितले.
अशी होणार टोल वसुली
रशियन प्रणालीवर आधारित नवीन जीपीएस तंत्रज्ञान टोल वसुलीसाठी देशात वापरण्यात येईल, असे गडकरी यांनी डिसेंबर 2020 मध्ये सांगितले होते. या प्रणालीद्वारे थेट प्रवाशांच्या खात्यातून किंवा ई-वॉलेटमधून टोलची रक्कम कापली जाणार आहे. टोल नाक्यांवर होणा-या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे टोल वसुलीची प्रक्रिया जलद करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारीपासून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community