…अन् शिवाजी पार्कात पुन्हा जुळले नात्यांचे बंध

कोरोना पार्श्वभूमीवर सण, उत्सव साजरे करण्यास जवळपास दोन वर्षे निर्बंध होते. यंदाच्या दिवाळीत मात्र हेच चित्र पूर्ववत झाल्याचे पाहायला मिळाले. शिवाजी पार्क म्हणजे गाठीभेटींच हक्काचं केंद्र स्थान, गेली दोन वर्षे सामसूम असलेले हे पार्क या दिवाळीत पुन्हा एकदा गजबजताना पाहायला मिळाले. अनेक वर्षांचे सवंगडी, शाळा कॉलेजमधील तरुणाई, परिसरात राहणारे रहिवासींमुळे शिवाजी पार्कात मोठ्या उत्साहाने दिवाळी पहाट साजरी झाली.

सर्वस्व शिवाजी पार्क

यंदा दिवाळी पहाटेला सर्वांनी आपला मोर्चा दादरच्या शिवाजी पार्ककडे वळवला. शाळा कॉलेजमधील तरुणाई फोटो काढण्यात, परिसरातील मंडळी गप्पागोष्टी करण्यात, अनेक वर्षांचे विखुरलेले मैत्रीचे बंध पुन्हा भेटण्यात, तर काही जाणकार मंडळी अनुभव सांगण्यात मग्न होती. या भव्य गोलाकार पार्काचा एकही चौक रिकामा नव्हता. आपुलकीने भेट घेताना लॉकडाऊनच्या कटू आठवणी मागे सारत शिवाजी पार्क पुन्हा एकदा आनंदाने बहरून गेले.

रोषणाईचे खास आकर्षण

पार्कात केलेली भव्य विद्युत रोषणाई यंदाचे खास आकर्षण आहे. चहूबाजूला रंगीबेरंगी रोषणाई, फुलांची सजावट यामुळे दरवर्षी दिवाळीला तमाम मुंबईकर आवर्जून शिवाजी पार्कला भेट देतात. दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उत्सावाला बहर आला असून लॉकडाऊनमुळे विखुरलेले नात्यांचे बंध पुन्हा जुळले गेले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here