रत्नागिरीत प्रथमच ‘सागर’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सागर महोत्सवासाठी रत्नागिरीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या महोत्सवात व्याख्याने, लघुपट, माहितीपटांचे सादरीकरण, वाळूशिल्प पाहण्याची पर्वणी आणि विशेष म्हणजे खडकाळ समुद्रकिनारे व खारफुटी जंगलाची सफर करता येणार आहे. येत्या १३ व १४ जानेवारीला, तसेच २१ व २२ जानेवारी अशा दोन टप्प्यांत हा महोत्सव संपन्न होणार आहे.
( हेही वाचा : लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० जागा जिंकणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा)
या महोत्सवाचे उद्घाटन १३ जानेवारीला सकाळी ९ वाजता राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सिंग यांच्या हस्ते गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होईल. त्यानंतर ९.३० वाजता सह्याद्री निसर्गमित्रचे भाऊ काटदरे यांचे कासवांचे संवर्धन या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता खारफुटी संवर्धनाबाबत लक्ष्मीकांत देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे. सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत समुद्र व पर्यावरण संवर्धनाविषयक माहितीपट, लघुपट प्रदर्शित केले जाणार आहेत. दुपारी २.३० ते ४ या वेळेत या क्षेत्रातील पुरस्कार विजेत्या माहितीपटांचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ४ वाजता खडकाळ समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता या विषयावर डॉ. अमृता भावे व्याख्यान देणार आहेत.
शनिवारी, १४ जानेवारीला सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत माहितीपट दाखवण्यात येतील. दुपारी १२.३० ला शाश्वत मासेमारी या विषयावर डॉ. केतन चौधरी यांचे व्याख्यान होईल. दुपारी २.३० वाजता मानवजातीच्या भविष्यासाठी महासागर या विषयावर डॉ. समीर डामरे, दुपारी ३.३० वाजता स्थानिक पक्षी या विषयावर प्रसाद गोखले व विराज आठल्ये यांचे व्याख्यान होईल. सायंकाळी ४ वाजता प्रश्नमंजूषा स्पर्धा होईल.
जानेवारीच्या उत्तरार्धात २१ आणि २२ तारखेला सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत भाट्ये समुद्रकिनाऱ्याची पायी सैर घडवण्यात येणार आहे. यावेळी प्रदीप पाताडे, अमृता भावे मार्गदर्शन करतील. सकाळी ७ ते ९.३० या वेळेत कर्ला येथील खारफुटी जंगलाची सफर संजीव लिमये आणि संतोष तोसकर घडवतील. दुपारी ३ ते सायंकळी ६ या वेळेत मांडवी येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्याची सफर प्रदीप पाताडे आणि अमृता भावे घडवतील. प्रत्येकाच्या आवडीनुसार समुद्रकिनारा, खारफुटी या भागात विद्यार्थी, रत्नागिरीकरांना सैर करता येणार आहे. याच कालावधीत देखणी वाळूशिल्पे भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पाहण्याची संधी पर्यटक आणि रत्नागिरीकरांना मिळणार आहे. महोत्सवासंबंधी अधिक माहितीसाठी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन (9970056523) यांच्याची संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community