भारतीय पर्यटनाच्या ‘उत्सव’ या Digital पोर्टलवर ‘महाराष्ट्र पर्यटन’ अव्वल स्थानावर

२०२१ मध्ये, कोविड-१९ च्या विळख्यात देश अडकला असताना भारतीय पर्यटन मंत्रालयाने (MoT) utsav.gov.in वेबसाइट प्रक्षेपित केली. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आपापल्या राज्यातील मंदिरांत होत असलेल्या पूजा व आरती याच्या लाईव्ह दर्शनाचे तपशील, पार पडलेल्या विविध कार्यक्रम आणि उत्सव याविषयी माहिती देण्यास सांगितले होते. याला महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्वरित प्रतिसाद देत सर्व आवश्यक तपशील सादर केले. ५ जुलै २०२२ रोजी पर्यटन विभागाद्वारे यशस्वी कार्यक्रम राबविणाऱ्या राज्यांची क्रमवार यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

( हेही वाचा : लोणावळा फिरायला जाताय? पोलिसांची पर्यटकांवर असणार करडी नजर)

‘महाराष्ट्र पर्यटन’ अव्वल स्थानावर

अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे/मंदिरे/तीर्थक्षेत्रे असलेले महाराष्ट्र राज्य हे सर्वधर्मीयांसाठी पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाते. शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी, त्र्यंबकेश्वर, वणी (सप्तशृंगी), मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर, अशा धार्मिक स्थळी भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. महामारीच्या काळात, जेव्हा भाविक या पवित्र स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊ शकत नव्हते, तेव्हा मंदिर प्रशासनाने ऑनलाइन दर्शनाचा पर्यायी मार्ग सुरू केला होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करून केवळ व्यवस्थापनासाठीच नव्हे तर भक्तांनाही त्यांच्या घरातूनच देव दर्शन घेणे सोयीचे झाले. पंढरपूरची वारी, गणेश चतुर्थी, गुढीपाडवा, दहीहंडी, नारळी पौर्णिमा इत्यादी सणांसाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. कोविड काळात साजरे झालेले हे सण व संबंधित तपशील सुद्धा वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहेत.

धार्मिक वैभव

“मला आनंद आहे की महाराष्ट्र पर्यटन विभाग डिजिटल ट्रेंडच्या अनुषंगाने चालत आहे जिथे पर्यटकांना एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध आहे. धार्मिक पर्यटन हा भारतातील पर्यटनाचा सर्वात जुना प्रकार असून, महाराष्ट्राला शिर्डी-शेगाव-पंढरपूर सारखे धार्मिक वैभव लाभले आहे त्याबद्दलची माहिती राष्ट्रीय व्यासपीठावरून मांडता येणं हे आमच्यासाठी गौरवाचे आहे. असे पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी सांगितले. सण हे आपल्या राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा एक मार्ग असून पर्यटन विकासासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असल्याने आम्ही पर्यटन विभागाच्या या उपक्रमात खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व भारतीय राज्यांतील सण आणि धार्मिक पर्यटनाची माहिती एका छताखाली आणण्यासाठी पर्यटन विभागाने केलेल्या प्रयत्नांचे मला कौतुक वाटते. अधिकाधिक देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी याचा निश्चितच फायदा होईल.” असेही नायर म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here