Pallonji Mistry : टाटा सन्स कंपनीत ‘बाँबे हाऊसचे फँटम’ अशी ओळख असलेले पालनजी मिस्त्री कोण होते?

Pallonji Mistry : टाटा सन्समधील सगळ्यात मोठे वैयक्तिक भागीदार अशी मिस्त्री कुटुंबाची कायम ओळख राहिली आहे. 

45
Pallonji Mistry : टाटा सन्स कंपनीत ‘बाँबे हाऊसचे फँटम’ अशी ओळख असलेले पालनजी मिस्त्री कोण होते?
  • ऋजुता लुकतुके

दक्षिण मुंबईतील फोर्ट भागात अनेक सरकारी आणि खाजगी व्यावसायिक इमारती मुंबईची शान म्हणून उभ्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर गेटवे ऑफ इंडिया समोरचं ताजमहल पॅलेज हॉटेल, मरिन लाईन्सवर चर्चगेट स्टेशनजवळ असलेलं ब्रेबॉर्न स्टेडिअम, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत, हाँगकाँग अँड शांघाय बँकेची इमारत, ग्रिंडलेज बँकेची इमारत, मुंबई शेअर बाजाराची इमारत… या सगळ्या इमारती आजही मुंबईची ओळख आहेत आणि त्यांची निर्मिती केली आहे ती १५९ जुन्या शापूरजी पालनजी समुहाने. टाटा सन्सचे सगळ्यात मोठे वैयक्तिक भागीदार ही शापूरजी मिस्त्री यांची आणखी एक ओळख. १९३० पासून शापूरजींनी टाटा सन्सचे शेअर खरेदी करायला सुरुवात केली आणि पुढे टाटा सन्सची मालकी बहुतेक करून विविध टाटा कुटुंबीयांनी सुरू केलेल्या ट्रस्टकडे गेल्यावर सगळ्यात मोठे वैयक्तिक भागीदार उरले ते शापूरजी पालनजी. (Pallonji Mistry)

शापूरजी मिस्त्री यांनी मुंबईत सुरु केलेला बांधकाम व्यवसाय त्यांचा मुलगा पालनजी मिस्त्री यांनी देशाबाहेर नेला. १९२९ मध्ये मुंबईतच पालनजी मिस्त्री यांचा जन्म झाला आणि १८ व्या वर्षी ते वडिलांच्या शापूरजी पालनजी कंपनीत संचालक म्हणून कामावर रुजू झाले. सुरुवातीपासून त्यांची नजर नवीन संधी शोधण्यात पटाईत होती. त्यामुळे आपला घरगुती व्यवसाय त्यांनी भारताबाहेर अबूधाबी, कतार, दुबई, आफ्रिकन देश आणि दक्षिण आशियात नेला. ओमानचा माजी सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचा कतारमधील राजवाडा पालनजी मिस्त्री यांनी उभारला आहे. १९७५ मध्ये बादशाहने हा राजवाडा लोकांसाठी खुला केला तेव्हा पालनजी मिस्त्रींचं नाव जगभरात पसरलं. (Pallonji Mistry)

(हेही वाचा – Konkan Railway वर दोन दिवसीय ब्लॉक; ‘या’ गाड्या उशिराने धावणार)

त्यांनीच आपल्या समुहाचा विस्तार बांधकाम उद्योगापासून ते वस्त्रोद्योग, ऊर्जा, पायाभूत सुविधा उभारणी, जलव्यवस्थापन आणि अगदी वित्तीय सेवांपर्यंत केला. शापूरजी पालनजी समुहाला त्यांनी एक वेगळी आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. पण, एरवी ते अतिशय मितभाषी. राजकारणी व्यक्ती, पार्ट्या, क्लबमधील गप्पा आणि मीडिया यापासून ते कायम लांब राहिले. घोडेसवारी आणि जंगलात मुक्त भटकणे ही त्यांची आवड होती आणि त्यासाठी पुण्यात त्यांनी आणि त्यांची पत्नी पॅटसी दुबाश यांनी १०,००० वर्ग फूटांचा मोठा बंगला आणि इस्टेट उभी केली होती. तिथे घोड्यांचा एक मोठा पागाही होता. महिन्यातून कधीही अचानक ते या जागेला भेट द्यायचे आणि अनेक दिवस इथंच राहायचे. बाकी लोकांमध्ये ते फारसे कधी मिसळले नाहीत. (Pallonji Mistry)

टाटा सन्समध्ये २०११ पर्यंत पालनजी मिस्त्री यांची हिस्सेदारी १८.४ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती आणि ते टाटा समुहाचे सगळ्यात मोठे वैयक्तिक भागीदार होते. पण, तिथेही बाँबे हाऊसमध्ये त्यांना लोक फँटम म्हणून ओळखायचे. कारण, ते इतके अबोल की, इमारतीत ते असल्याचं कुणाला कळायचंही नाही. मोठ्या गाड्या वापरणे, बडेजाव मिरवणे हे कधी त्यांनी केलंच नाही. कामाला मात्र चोख असायचे. त्यामुळेच त्यांना हे टोपणनाव पडलं होतं. (Pallonji Mistry)

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांचा ‘तो’ ड्रीम प्रोजेक्ट पुन्हा चर्चेत)

त्यांचा धाकटा मुलगा सायरस मिस्त्री २०१२ मध्ये रतन टाटा यांच्यानंतर समुहाचा अध्यक्ष झाला तेव्हा पालनजींचं नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं. त्यांच्या आणि टाटा कुटुंबीयांमधील संबंधांना उजाळा मिळाला. २०१६ मध्ये उद्योग क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला तेव्हा पालनजी ७७ वर्षांचे होते. (Pallonji Mistry)

तेव्हा त्यांची मालमत्ता ३० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. ते आयर्लंडमधील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती होते. तर भारतातही त्यांचा क्रमांक पहिल्या दहांत होता. जगभरात ते १४३ व्या क्रमांकावर होते. वयाच्या ९२ व्या वर्षी १०२२ मध्ये त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. दैवदुर्विलास हा की, त्यानंतर ३ महिन्यातच त्यांचा धाकटा मुलगा आणि टाटा सन्सचं अध्यक्षपद भूषवलेला सायरस मिस्त्री याचंही अपघाती निधन झालं. पालनजी मिस्त्री यांच्या आयुष्यातील शेवटची ७ वर्षं टाटा समुहाबरोबर त्यांच्या झालेल्या भांडणामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या कोर्ट-कचेऱ्यांमुळे जिकिरीची गेली. (Pallonji Mistry)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.