भविष्याचा विचार करून नागरिक विविध बॅंकेच्या योजना, म्युचुअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्हीसुद्धा बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर भारतीय पोस्ट खात्याच्या विविध बचत योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे सरकारी योजनेत गुंतवणूक करणे सर्वात जास्त सुरक्षित असते. पोस्टाच्या सुमंगल ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स स्किमविषयी जाणून घेऊया…
( हेही वाचा : इलेक्ट्रिक वाहनांना आग का लागते? केंद्रीय समितीने अहवाल केला सादर)
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना भारतातील ग्रामीण लोकांसाठी बनवण्यात आली आहे. या योजनेत दररोज ९५ रुपयांची छोटी गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवून देऊ शकते. ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना ही पोस्ट ऑफिसची मनी बॅक योजना आहे.
१९ ते ४५ वर्ष या वयोगटतील भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये नागरिकांना १० लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास सर्व पैसे त्याच्या कुटुंबाला मिळतील. १५ वर्ष किंवा २० वर्ष ग्राहक आपल्या सोयीनुसार मॅच्युरिटीचा कालावधी निवडू शकतात.
एखाद्या २५ वर्षांच्या व्यक्तीने १० लाखांच्या विमा रकमेसह ही पॉलिसी घतेली तर संबंधित व्यक्तीला दररोज ९५ रुपये प्रिमियम भरावा लागेल. दररोज ९५ रुपये प्रिमियम पकडला तर ३० दिवसांचे २ हजार ८५० रुपये भरावे लागतील, याचप्रमाणे ६ महिन्यांचे १७ हजार १०० रुपये भरावे लागतील. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला जवळपास १४ लाख रुपये मिळू शकतील. जर तुम्ही १५ वर्षांची पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला ६ वर्षे, ९ वर्षे आणि १२ वर्षांमध्ये पॉलिसीचे २० टक्के पैसे परत मिळतील. त्याचवेळी, उर्वरित ४० टक्के रक्कम मॅच्युरिटीनंतर उपलब्ध होईल.
या योजनेतून महिलांना आर्थिक मदत मिळते
या योजनेत फक्त ग्रामीण भागातील लोकच गुंतवणूक करू शकतात. ही योजना समाजातील अशा घटकांसाठी सर्वात फायदेशीर आहे जे सामान्यतः विमा योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. यामध्ये महिलांचीही संख्या मोठी आहे. समाजातील दुर्बल घटकही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत कारण सरकार पैशांची हमी देते.
सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेविषयी…
- ग्राम सुमंगल योजना ही एक मनी बॅक योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी परतावा मिळतो.
- या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदारांना यामध्ये डेथ बेनिफिटचाही लाभ मिळतो. जर पॉलिसीधारक पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाला, तर नॉमिनीला विमा रकमेचा लाभ मिळतो.
- तुम्ही या योजनेत १५ किंवा २० वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.