‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले सेवा विवेक संस्थेचे विशेष कौतुक

151

“मन की बात” कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेवा विवेक संस्थेच्या सामुदायिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. रविवारी मन की बातचा या वर्षातील शेवटचा म्हणजेच, ९६ वा एपिसोड होता. पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रातील पालघर जिल्हातील आदिवासी समाजातील कुशल बांबू कारागीर लोकांकडून बांबू हस्तकला पासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंची माहिती दिली. बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या बॉक्स, खुर्ची, चहादाणी, टोकेरी आणि ट्रे सोबत विविध गोष्टींची प्रशंसा केली तसेच आज खूप लोकप्रिय झाल्या आहेत यामुळे आदिवासी महिलांना रोजगार सोबतच मानसन्मान मिळत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

( हेही वाचा : तुनिषाला झीशानने ‘वापरले’; आईचा गंभीर आरोप )

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमानंतर आपल्या ट्विटर हँडलवरून सेवा विवेक सामाजिक संस्थेचे पालघर जिल्ह्यातील सामुदायिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे. या महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते.

पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडोहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेतल्यावर महिलांनी बांबूपासून उत्तम दर्जेदार पर्यावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे. उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे. यावर्षी महिलांनी बनवलेल्या राखी व कंदीलांना विदेशातही मागणी होती. तसेच वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर ,मोबाईल होल्डर , पात्राधर , फिंगर जॉइंट ट्रे तयार यांसारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तूंचा समावेश आहे. ग्राहकांच्या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे.

चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घरची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहे. गेल्यावर्षी सेवा विवेकच्या कार्याचा माजी राष्ट्रपती व राज्यपालांनी कौतुक केले आहे. माजी राष्ट्रपतींकडूनही हस्तकला प्रशिक्षित आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला होता. आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला या संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत तसेच नवीन महिलांना त्या प्रशिक्षण देत आहेत. या मुळेच आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.