सणासुदीच्या काळात रेल्वे बुकिंग फुल्ल, विमानांची उड्डाणेही वाढली; प्रवाशांकडून दिवाळी विशेष गाड्या सोडण्याची मागणी

130

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे लोकांनी सुट्यांचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ९८ टक्के रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे आता गावी कसे जायचे? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याउलट कोरोनानंतर रविवारी २ ऑक्टोबरला पहिल्यांदाच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १७२ प्रवासी विमानांची ये-जा झाली, त्याद्वारे २५ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे आणखी वाढणार असून विमानाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार)

विमानाचा प्रवास आजही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांचे प्रथम प्राधान्य रेल्वेलाच असते. पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या रेल्वेंपैकी ९८ टक्के रेल्वे फुल्ल झाल्याने परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अजून पर्यंत रेल्वे बोर्डाकडून दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव, छटपूजा आणि उन्हाळी सुट्ट्यांसाटी विशेष गाड्या चालवल्या जातात. याच प्रकारे रेल्वेमार्फत दिवाळी विशेष रेल्वे कधी सुरू करणार हा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या विमानांच्या संख्येत सुद्धा वाढ करण्यात आली असून दिवसाला १५ ते १७ हजार प्रवासी विमानाने ये-जा करतात ही संख्या लागोपाठ सुट्ट्या आल्या की आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.