ratangad fort : रतनगड किल्ल्याचं नाव कोणाच्या “नावा”वरुन पडले?

103
ratangad fort : रतनगड किल्ल्याचं नाव कोणाच्या "नावा"वरुन पडले?
रतनगड हा किल्ला महाराष्ट्रातल्या भंडारदरा येथे आहे. भंडारदरा हे सर्वांत जुन्या कृत्रिम पाणलोट क्षेत्रांपैकी एक आहे. हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यात वसलेला आहे. हे ठिकाण अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. हा किल्ला सुमारे ४०० वर्षे जुना आहे. नोव्हेंबरमध्ये हा किल्ला अनेकदा वेगवेगळ्या फुलझाडांनी झाकलेला दिसून येतो. रतनगड किल्ल्याला ‘सह्याद्रीचं रत्न’ असंही म्हणतात. (ratangad fort)
रतनगड येथील पाहण्यासारखी ठिकाणे
रतनगडावर एक असा नैसर्गिक खडक आहे, ज्याच्या शिखरावर एक नैसर्गिक पोकळी आहे. ही पोकळी १० फूट उंच आणि ६० फूट रुंद आहे. या पोकळीला ‘नेधे’ किंवा ‘आय ऑफ द नीडल’ असं म्हणतात. या गडाला गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक असे चार दरवाजे आहेत. मुख्य द्वारावर गणपती आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. गडाच्या वरच्या बाजूला अनेक विहिरी आहेत.
रतनवाडी इथलं मुख्य आकर्षण म्हणजे हेमाडपंत काळातलं – साधारण आठव्या शतकापासूनचं कोरीवकामासाठी प्रसिद्ध असलेलं अमृतेश्वर मंदिर होय. रतनगड हा किल्ला प्रवरा/अमृतवाहिनी नदीचं उगमस्थान आहे. या नदीवर भंडारदरा धरण म्हणजेच अर्थर धरण बांधलेलं आहे. (ratangad fort)
रतनगडाच्या माथ्यावरून शेजारी असलेले अलंग, कुलंग, मदन गड, हरिश्चंद्रगड, पट्टा हे किल्ले सहज दृष्टीक्षेपात येतात. संपूर्ण भंडारदरा धरणाचं म्हणजेच लेक आर्थरचं दृश्य मनाला निखळ आनंद देणारं आहे. या गडावर पाण्याचे अनेक दगडी टाके आहेत. त्यांपैकी काही टाक्यांमध्ये वर्षभर पिण्यायोग्य पाणी साठवलं जातं.
रतनगडाच्या पूर्व दिशेला दोन गुहा आहेत. या गुहांचा वापर रात्रीच्या मुक्कामासाठी केला जातो. रतनगड या किल्ल्याला वर्षाच्या बाराही महिने भेट देता येते. पण ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या काळात जनावरांचा सुळसुळाट असतो.
रतनगडचा इतिहास
रतनगड हा किल्ला ४०० वर्षं जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रतनगड स्वराज्यात सामावून घेतला होता.
रत्नाबाई तांदळ यांच्या नावावरून या किल्ल्याला रतनगड नाव देण्यात आलं आहे. रत्नाबाई तांदळ यांचं गडावरीच्या गुहेच्या आत एक छोटेसं मंदिर आहे.
रत्नाबाई, कळसूबाई आणि कात्राबाई या तिघी बहिणी होत्या. (ratangad fort)
रतनगडावर कसं पोहोचता येतं?
गडावर जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत. एक मार्ग साम्रद गावातून जातो, तर दुसरा मार्ग रतनवाडी गावातून सुरू होतो. भंडारदरा येथून बोटीने किंवा घोटी-भंडारदरा रस्त्याने रतनवाडी या किल्ल्याचं पायथ्याचं गाव गाठता येतं. बोटीने ६ किलोमीटरचा प्रवास आहे. त्यानंतर पुढे रतनवाडीपर्यंत ४ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. (ratangad fort)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.