-
ऋजुता लुकतुके
लोणावळ्यातील अँबी व्हॅली सिटी (Aamby Valley City) आणि मुंबईतील सांताक्रूझ विमानतळाच्या (Santacruz Airport) जवळ असणारं सहारा स्टार हॉटेल (Sahara Star) या माध्यमातून २००० च्या दशकात सहारा इंडिया परिवाराने हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात झोकात प्रवेश केला. सहारा एअरलाईन, सहारा मीडिया हाऊस, आयपीएलचा क्रिकेट संघ अशी घोडदौड सुरू असतानाच कंपनीचे संस्थापक सुब्रतो रॉय यांनी मुंबईतील विमानतळा जवळचं स्टार हॉटेल विकत घेतलं. आणि पाठोपाठ न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये प्लाझा हॉटेलची प्रॉपर्टी विकत घेत त्यांनी या क्षेत्रात जोरदार पाऊल ठेवलं.
सहारा समुहात एकेकाळी १० लाखांच्या वर कर्मचारी कामावर होते. आणि २,००० रुपयांच्या भांडवलावरून कंपनी २७,००० कोटींच्या भांडवलापर्यंत पोहोचली होती. पण, माशी शिंकली जेव्हा सुब्रतो रॉय यांच्यावर चिटफंडाच्या माध्यमातून लाखो भारतीयांचे पैसे बेकायदा पद्धतीने गडप केल्याचा आरोप झाला तेव्हा. हळू हळू या अख्ख्या साम्राज्यालाच उतरती कळा लागली. खुद्द रॉय यांचं २०२३ मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी निधनही झालं. त्यांनी आपल्या हयातीतच २०१८ मध्ये न्यूयॉर्क आणि लंडनमधील आपली हॉटेल विकली आहेत.
(हेही वाचा – महाराष्ट्राचा तुरुंग तहव्वूर राणासाठी तयार : CM Devendra Fadnavis यांची माहिती)
पण, मुंबईतील स्टार सहारा हे हॉटेल अजूनही सहारा समुहाचा भाग आहे. आणि त्यांनी ते चालवण्यासाठी बाहेरच्या कंपनीला दिलं आहे. पूर्ण सफेद रंगसंगतीतील हे हॉटेल बाहेरूनच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. भारतीय संस्कृतीची ओळख पटवून देणारी इथली सजावट आहे. आणि सुविधा म्हणाल तर ३५४ राजेशाही खोल्या आणि २५ मोठी स्विट्स या हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. ५ आंतरराष्ट्रीय दर्जाची रेस्टाँरंट ही विमानतळावर ट्रान्सिटसाठी आलेल्या लोकांची लाडकी आहेत.
इथला ओक्टोबरफेस्ट हा लोकप्रिय आहे. आणि अलीकडेच कोव्हिडनंतर तो पुन्हा सुरू झाला आहे. इमारतीच्या मध्यभागी असलेला घुमट हा या हॉटेलचं वैशिष्ट्य मानला जातो. खांब आणि छतही नसलेली हा सगळ्यात मोठा घुमट आहे. इथं फक्त काचेची संरक्षक भिंत आहे. आणि त्यामुळे इथे बसलेल्या लोकांना आकाशातील मनोरम दृश्य थेट अनुभवता येतं. नैसर्गिक प्रकाश योजना इथं ठेवण्यात आली आहे. इथल्या एका खाजगी डायनिंग रुममध्ये ४००० वर्गफूटांच्या जागेवर एक मत्स्यालय आहे. आणि तिथेही लोकांची मोठी गर्दी होते. स्टार सहारातील मल्टीपर्पज हॉल हा २५ फूट उंच आणि ५५,००० वर्ग फूटांचा आहे. मुंबईतील मोठ्या बँक्वेट हॉलपैकी हा एक आहे. याशिवाय इथली जेड रुम ही १०,००० वर्गफूटांची अशी जागा आहे जिथे एकही खांब नाही. त्यामुळे सलग जागा इथं मिळते. एकावेळी १,००० लोक इथं जमा होऊ शकतात. त्यामुळे कॉर्पोरेट ग्राहकांसाठी ही जागा आवडीची आहे.
आता सहारा समुहाचा दबदबा पूर्वीसारखा राहिला नसला तरी स्टार सहारा हे हॉटेल या समुहाच्या जुन्या वैभवाच्या काही खुणा सांभाळून आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community